सहकार महर्षी माजी खासदार चुन्नीलाल भाऊ ठाकूर कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:25 AM2019-12-31T10:25:40+5:302019-12-31T10:25:59+5:30
भंडारा-गोंदिया क्षेत्राचे माजी खासदार व भाजपाचे वरिष्ठ नेते चुन्नीलाल भाऊ ठाकूर यांचे ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ वा. दीर्घ आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: भंडारा-गोंदिया क्षेत्राचे माजी खासदार व भाजपाचे वरिष्ठ नेते चुन्नीलाल भाऊ ठाकूर यांचे ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ वा. दीर्घ आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. सहकार महर्षी ते परिपक्व राजकारणी असलेल्या चुन्नीलाल ठाकूर यांच्यावर त्यांच्या गोरेगाव तालुक्यातील सटवा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
१९७० पासून सटवा येथील सेवा सहकारी संस्थेच्या संचालक पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दि. गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आॅप. बँकेचे संचालक, सचिव व उपाध्यक्ष पद भूषविले. सतत 30 वषार्पासून ते बँकेच्या संचालक पदावर कार्यरत होते. त्यानंतर सन 1990 मध्ये त्यांनी तत्कालीन गोरेगाव विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने निवडणूक लढवून श्रीकांत जिचकार यांचा पराभव करीत विजय मिळविला. सटवासारख्या छोट्या गावातून राजकारणाची सुरुवात करून संसदेत पोहोचण्याचा मान त्यांनी मिळवुन राजकारणात कसे आपल्याला प्रस्थापित करता येते याचे उदाहरण त्यांनी नवख्या राजकारण्यांना दाखवून दिले होते. त्यांच्या अशा जाण्याने गावाची व क्षेत्राची झालेली हानी भरून निघणारी नाही. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी, पत्नी व नातवंड असा आप्त परिवार आहे.