एकाच सातबारावर चारवेळा धानाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:00 AM2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:55+5:30
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाच्या शंभरावर धान खरेदीवर केंद्रावरुन धान खरेदी करण्यात आली. धानाला यंदा १८२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि प्रोत्साहान अनुदान आणि बोनस असे मिळून एकूण २५२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एकाच सातबारावर एकदा धान विक्री करता येता असा नियम असला तरी शासकीय धान खरेदी केंद्रावर हा नियम लागू होत नसल्याचे चित्र आहे. एकाच सातबारा एक वेळा नव्हे तर चक्क चार वेळा धान खरेदी करुन बोनसचा देखील लाभ घेण्यात आला.हा सर्व प्रकार केवळ शासकीय धान खरेदी केंद्रावरच शक्य असल्याचे आता काहीजण छातीठोकपणे बोलून दाखवित आहे. हा प्रकार जिल्ह्यातील काही खरेदी केंद्रावर उघडकीस आला आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाच्या शंभरावर धान खरेदीवर केंद्रावरुन धान खरेदी करण्यात आली. धानाला यंदा १८२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि प्रोत्साहान अनुदान आणि बोनस असे मिळून एकूण २५२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळेच यंदा एकट्या जिल्हा मार्केंटिंग फेडरेशन खरीप व रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी केली. पण जिल्ह्यातील एकूण धान लागवडीचे क्षेत्र आणि झालेले उत्पादन पाहता धान खरेदी ही अधिक झाल्याची चर्चा होती. त्यामुळे बाहेरील जिल्हा आणि राज्यातील धानाची या खरेदी केंद्रावर विक्री केल्याचे सुध्दा आता स्पष्ट झाले आहे. काही खासगी व्यापाऱ्यांनी तलाठ्यांना हाताशी घेवून एकाच सातबारावर वेगवेगळ्या शेतकºयांची नाव टाकून चारवेळा धानाची विक्री केली. ऐवढेच नव्हे तर शाळेकरी मुलांच्या आधारकार्डवरील नाव आणि वयात बदल करुन त्याचा सुध्दा धानाची विक्री करण्यासाठी उपयोग केल्याची माहिती आहे. ऐवढेच नव्हे तर काही बनावट सातबारा देखील तयार करण्यात आल्याची माहिती आहे. हा प्रकार सालेकसा तालुक्यातील काही केंद्रावर सर्वाधिक घडला आहे. याची लेखी तक्रार सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शासकीय धान खरेदी केंद्राचा उपयोग शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाºयांना अधिक झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे तक्रारकर्त्यांने हा सर्व घोळ कसा करण्यात आला. कोणत्या शेतकऱ्याच्या नावाचे बनावट सातबारा तयार करण्यात आले, एकाच सातबारावर चार वेगवेगळ्या शेतकऱ्यांची नावे कशी चढविण्यात आली, खरेदी केंद्रावर यासर्व प्रकाराकडे कशी डोळेझाक करण्यात आली याची लेखी तक्रारीत नोंद केली आहे. धान खरेदी केंद्रावरील सातबारा आणि शेतकऱ्यांच्या मुख्य सातबाराची पडताळणी केल्यास याचे बिंग सहज फुटू शकते. यात कोट्यवधी रुपयांचा घोळ असून खरेदी केंद्राशी निगडीत लोकांचे खरे चेहरे सुध्दा उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेती नसलेला व्यक्ती झाला शेतकरी
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी तुमच्यावर नाव शेती आणि त्याचा सातबारा, आधारकार्ड, नमुना आठ ही कागदपत्रे आवश्यक आहे. त्याशिवाय धानाची विक्री करता येत नाही. मात्र शेती नसलेल्या व्यक्तीच्या नावावर शेती दाखवून आणि त्याच्या नावे बनावट सातबारा तयार करुन धानाची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.शिवाय हीच कागदपत्रे जोडून बँकेत खाते उघडून त्याच नावावर बोनसचा सुध्दा लाभ घेण्यात आला आहे. यावर सर्व प्रकाराची सुध्दा लेखी तक्रार करण्यात आली आहे.
शेतकºयांकडून २५ रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त
धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकºयाचा धानाचा काटा करणे, त्यानंतर त्याची छल्ली मारणे, कट्टे शिवणे याकरिता शासनाकडून प्रति क्विंटल ११ रुपये प्रमाणे धान खरेदी केंद्राला दिले जातात. मात्र यानंतरही काही खरेदी केंद्रावर शेतकºयांकडून २५ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अतिरिक्त पैसे घेण्यात आल्याची ओरड आहे.
चौकशी अहवालाची माहिती देण्यास टाळटाळ
जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आली. संबंधितानी चौकशी अहवाल तयार करुन जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे सोपविला आहे. या अहवालात बराच सावळा गोंधळ पुढे आल्याची माहिती आहे. मात्र याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतकºयांच्या नावावर लोणी खाणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भरडाईस जाणाऱ्या कट्टयावरील शिक्का गायब
शासकीय धान खरेद केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान राईस मिलर्सच्या माध्यमातून भरडाई केला जातो. त्यानंतर सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र केंद्रावरुन धानाची उचल करताना त्या कट्टयावर संबंधित केंद्राचा शिक्का मारला जातो. त्यावर केंद्राचे नाव, लॉट नंबर, धानाचा प्रकार, वजन लिहिले असते.मात्र काही केंद्रावर भरडाईसाठी धान पाठविताना कट्टयावर शिक्काच मारला जात नसल्याची माहिती आहे.