बंधारा दुरूस्तीच्या नावावर निधीची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:58 AM2018-06-06T00:58:15+5:302018-06-06T00:58:15+5:30
दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानास सुरूवात केली. या अभियानातंर्गत सध्या तिरोडा तालुक्यात बंधारा दुरूस्ती व नवीन बंधारे तयार करण्याची कामे सुरू आहे. मात्र जिथे दुरूस्तीची गरज नाही तिथे सुध्दा बांधकाम करुन शासकीय निधीची उधळपट्टी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानास सुरूवात केली. या अभियानातंर्गत सध्या तिरोडा तालुक्यात बंधारा दुरूस्ती व नवीन बंधारे तयार करण्याची कामे सुरू आहे. मात्र जिथे दुरूस्तीची गरज नाही तिथे सुध्दा बांधकाम करुन शासकीय निधीची उधळपट्टी केली जात आहे. पण यासर्व प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला.त्यानंतर हा निधी जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, कृषी राज्यस्तर, जि.प.कृषी, मृद व जलसंधारण विभागाला देण्यात आला.
या विभागांतर्गंत मामा तलावाचे गेट, ओव्हरफ्लो भिंतीचे काम, नाली, कालवा दुरुस्ती, बंधारा दुरुस्तीचे कामे सुरू करण्यात आली आहे. जि.प.लघू पाटबंधारे विभाग तिरोडा अंतर्गत तालुक्यातील खैरलांजी, बिहिरीया, बघोली, अर्जुनी, परसवाडा यासह विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. खैरलांजी, अर्जुनी, परसवाडा येथील मामा तलावाच्या गेटचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याची तक्रार आहे. या ठिकाणी वेस्ट वेअर बांधकामाची गरज नसताना सुध्दा बांधकाम करुन निधीचा अपव्यय केला जात आहे. तलावाच्या गेट बांधकामात सुध्दा निकृष्ठ दर्जाच्या रेतीचा वापर करण्यात आला. तर अल्प प्रमाणात सिमेंटचा वापर करुन पिचींग जुन्याच दगडाने करण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट पेटी पध्दतीने दिल्याची माहिती आहे. याबाबत गावकºयांनी तक्रार करुन सुध्दा त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
एवढा खटाटोप कशासाठी?
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिरोडा तालुक्यात विविध कामे सुरू आहेत. ही कामे करताना ज्या शेतकºयाच्या जागेवर बंधाºयाचे बांधकाम केले जात आहे. त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. बांधकामाचा दर्जा कसा चांगला राहील याची काळजी घेण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. मात्र तिरोडा तालुक्यात नेमके याविरुध्द चित्र आहे. जि.प.लघू सिंचन विभागाचा हा सर्व खटाटोप कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांची सहमती न घेताच बांधकाम
मृद जल संधारण विभागाअंतर्गत परसवाडा येथील भीमराव मेश्राम व छगन मरस्कोल्हे यांच्या शेतात त्यांची मंजुरी न घेताच बंधारा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. त्या ठिकाणी नालाच नाही. मामा तलावाच्या ओव्हरफ्लोचा पाटचारा बंधाºयापासून ५० मीटर अंतरावर तयार करण्यात येत आहे. त्या ठिकाणी पाणी साठवून ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रार सुध्दा केली. मात्र कंत्राटदारांकडून सदर शेतकऱ्यांनाच धाकधपट केले जात आहे. याची तक्रार सुध्दा दवणीवाडा पोलीस स्टेशन येथे भीमराव मेश्राम यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज
तिरोडा तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ सुरू आहे. याची काही शेतकºयांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची दखल घेवून सुरू असलेल्या बांधकामाची चौकशी करुन यातील दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.