तंत्रनिकेतनच्या पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:27 AM2021-02-07T04:27:39+5:302021-02-07T04:27:39+5:30
अर्जुनी-मोरगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत सरस गुण देण्यात ...
अर्जुनी-मोरगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत सरस गुण देण्यात आले. त्यामुळे उन्हाळी २०२० पर्यंत उत्तीर्ण झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांना त्यातुलनेत टक्केवारी कमी असल्याने हजारों जुने विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित झाले आहेत. प्रवेश न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. शासनाने अशा विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद पडल्या. या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत गुणांची सरबराई झाली. जवळपास प्रत्येक विद्यार्थी तंत्रनिकेतन पदविका अंतिम वर्षात उत्तीर्ण झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. याचा जुन्या विद्यार्थ्यांवर थेट परिणाम झाला. हा एकप्रकारचा जुन्या विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो व यासाठी मर्यादित जागा असतात. या जागांवर कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत गुणांची खैरात झाल्याने अंतिम वर्षाला राहून तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्णी लागली.
प्राविण्यप्राप्त व प्रथम श्रेणीत पदविका मिळविणारे जुने विद्यार्थी मात्र प्रवेशापासून वंचित राहिले. एरव्ही दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त असायच्या. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या शैक्षणिक सत्रामुळे स्पर्धा वाढली व अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झाले. आजघडीला पूर्व विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ( बीई ) थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी एकही जागा शिल्लक नाही. आता प्रवेश न मिळालेल्या अशा विद्यार्थ्यांनी वर्षभर काय करायचे असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.
---------------------
दलालांचा सुळसुळाट
शहरी भागात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत तंत्रनिकेतन संस्था कमी आहेत. संस्थांची गुत्तेदारी कायम टिकवून ठेवण्यासाठी संस्थाचालकांनी ग्रामीण भागात दलाल नेमले आहेत. हे दलाल तंत्रनिकेतन उत्तीर्ण व अंतिम वर्षाला असलेल्या पालकांच्या घरी भेटी देऊन अभियांत्रिकी प्रवेश मिळवून देतो, त्याउपरही त्याला पैसे देऊ, अभियांत्रिकी अभ्यासक्रमादरम्यान त्याला कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशी बतावणी करतात. पालकांना मोफत अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रलोभन दाखवितात. या मोबदल्यात संस्थाचालक दलालांकडून विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र मिळताच त्यांना प्रति विद्यार्थी १५ ते २० हजार रुपयांची बक्षिसी देतात. मात्र यावर्षी दलालांचा डाव फसला. संस्थाचालकांनी दिलेली बक्षिसी यावर्षी पहिल्यांदाच दलालांनी त्यांना परत केली. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर संस्थाचालक डल्ला मारतात. यातून ते दरवर्षी लाखोंची माया मिळवितात. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचा पैशांसाठी छळ होतो. अनेक विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र अडवून ठेवले जात असल्याचेही वृत्त आहे. नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली, सेंदूरवाफा, तुमसर, तिरोडा, पवनी व ग्रामीण परिसरात अशा दलालांचे रॅकेटच असल्याचे समजते.