मोबाईल चोरांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:07 PM2019-05-09T21:07:17+5:302019-05-09T21:07:56+5:30
शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.
शहरात सध्या रस्त्याने जात असलेल्या लोकांचे मोबाईल दुचाकीवरून हिसकावून नेण्याचे, निर्जनस्थळी शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल व पैसे हिसकाविणे आणि लग्नात आलेल्या वºहाडींना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यांतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात विविध घटनांत तक्रार नोंद करण्यात आल्या आहेत.
या घटनांना गांभीर्याने घेत रामनगर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. यांतर्गत पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणले असून यात सुरद सागर (रा.सावराटोली), योगेश उर्फ दयालू शहारे (रा.गौतमनगर), सुरेंद्र सोनकुसरे (रा.गौतमनगर) यांना अटक केली आहे. तर चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवून बाल न्यायालयात पाठविले आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणे प्रभारी स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवणे, राजेंद्र कुंभार, नायक दारासिंग पटेल, प्रशांत माने, रियाज शेख, शिपाई शाम राठोड, सोनवणे यांनी केली.