गोरेगाव : तालुक्यातील पाच हजार २३१ घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या निर्देशानुसार खनिकर्म विभागाने येथील तहसील कार्यालयास मोफत पाच ब्रास वाळू देण्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज जानेवारी महिन्यात मागविले होते. परंतु, या अर्जाची दखल घेण्यात आली नसल्याने मोफत पाच ब्रास वाळूचे स्वप्न भंग झाले आहे.
शासनाच्यावतीने रमाई घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना, सबरी घरकुल योजना व इतर घरकुल योजना राबविल्या जात आहेत. या योजनांतील चार हजार २३१ लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू देण्याचे निर्देश खनिकर्म विभाग, गोंदिया यांनी तहसील कार्यालयास दिले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांपूर्वीच तहसीलदारांच्या नावाने अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्यातील वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने वाळू उपसा नियमानुसार बंद होता, पण वाळू चोरीवर आळा घातला गेला नव्हता. चोरटी वाळू वाहतूक करून एक ट्रॅक्टर ट्राॅली पाच हजार रुपये ते पाच हजार ५०० रुपयांपर्यंत या लाभार्थ्यांनी खरेदी केली आहे. काही लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने घरकुलाचे बांधकाम अर्धवट करून सोडले होते. या लाभार्थ्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल बाधकाम पूर्ण करा, अशी नोटीस बजावली आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्यासाठी चार वाळूघाट राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु, या घाटातून वाळू उपसा करून वाहतूक नसल्याचे बोलले जात आहे. त्याचा फटका घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे.
.....
बांधकाम साहित्याच्या दरात वाढ
काही लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती महागडी वाळू खरेदी करण्याची नसल्याने अर्धवट घरकुलाचे बांधकाम केले आहे. तालुक्यातील वीटभट्टी मालकांना राजस्व विभागाने परवानगी दिली नसली, तरी एक हजार ५०० विटांसाठी सात हजार ते आठ हजार रुपये मोजावे लागत आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अंशत: टाळेबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सिमेंट, तार, लोखंड व इतर आवश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत.
......
‘शासनाने लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू द्यावी व हार्डवेअरची दुकाने, सिमेंट एजन्सी दुकाने बंद करू नयेत. जेणेकरून घरकुल बांधकाम करता येईल, अन्यथा त्यांना उघड्यावर राहावे लागेल.
साहेबराव कटरे, माजी पंचायत समिती सदस्य.