गोंदिया @ ४२.२, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर
By कपिल केकत | Published: June 6, 2023 06:12 PM2023-06-06T18:12:26+5:302023-06-06T18:13:14+5:30
नवतपापेक्षा जास्त तापलेला : आता उकाडा झाला असह्य
गोंदिया : जून महिना सुरू झाला असून ७ जूनपासून मान्सून सुरू होतो व उन्हाळ्यापासून सुटका होते. मात्र, यंदा मान्सून लांबल्याने मे महिन्यापेक्षा जून महिना जास्त तापत आहे. मंगळवारी (दि.६) जिल्ह्याचा पारा ४२.२ अंशावर होता व गोंदिया जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता. यामुळे आता जिल्हावासीयांना उकाडा असह्य झाला असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
अवकाळी पावसाने यंदा मार्च व एप्रिल महिन्यात ठाण मांडून जिल्हावासीयांचे दोन महिने गारव्यात काढून दिले. मात्र, जून महिना लागताच पाऊस पसार झाला व येथूनच उन्हाळा आपल्या रंगात आला. दिवसेंदिवस वाढत गेलेल्या तापमान व त्यात उकाड्यामुळे जिल्हावासीय पार भाजून निघाले आहेत. विशेष म्हणजे, नवतपामध्ये सर्वाधिक उन्हाळा तापतो, असे म्हटले जाते. मात्र, यंदा परिस्थिती विपरीत असून मे महिन्यात जेवढा उकाडा जाणवला नाही तेवढा उकाडा आता जाणवत आहे. जून लागूनही तापमानात घट होत नसून उलट उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे.
मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३ अंशावर होते व जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ४२.२ अंशाने गोंदिया जिल्हा होता. यावरून गोंदिया जिल्ह्यातील उन्हाळ्याची अनुभूती येते. हवामान खात्याने मान्सून लांबल्याचे सांगितले असून त्यात सूर्य आग ओकत असल्याने जिल्हावासीय पार भाजून निघाले असून त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
गोंदिया जिल्हा आघाडीवर
- सूर्यदेव सध्या विदर्भावर आग ओकत असून त्यातही गोंदिया जिल्ह्यावर नाराज दिसत आहे. यामुळेच मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहत आहे. शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंश होते व जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. रविवारी गोंदिया व ब्रह्मपुरी जिल्ह्याचे तापमान ४२.५ अंश होते व ते पहिल्या क्रमांकांवर होते. सोमवारीही तसेच ऊन तापले, तर मंगळवारी गोंदिया जिल्हा ४२.२ अंश तापमानाने परत एकदा दुसऱ्या क्रमांकावर होता.