गोंदिया : नवतपा सरला असूनही उन्हाची तीव्रता काही कमी होत नसून उन्हामुळे जीवाची काहिली सुरूच आहे. अशातच रविवारी (दि.४) गोंदिया व ब्रह्मपुरी जिल्ह्याचा पारा सर्वाधिक ४२.५ अंशांवर होता. यामुळे गोंदिया व ब्रह्मपुरी जिल्हे रविवारी विदर्भात सर्वांत ‘हॉट’ ठरले.
नवतपातील नऊ दिवस सर्वांत जास्त तापणारे असतात असे म्हटले जाते. मात्र, आता नवतपा संपला असून त्यानंतरही दिवस तापत असल्याचा अनुभव येत आहे. शनिवारी जिल्ह्याचा पारा ४३.५ अंशांवर गेला होता. यंदा २० एप्रिलनंतर दुसऱ्यांदा ४३.५ तापमानाची नोंद घेण्यात आली असून, शनिवारी जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता.
मात्र, रविवारी तापमानात थोडीफार घट झाली असूनही गोंदिया व ब्रह्मपुरी जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक ४२.५ अंशांवर होते. यामुळे गोंदिया व ब्रह्मपुरी जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होते. हवामान खात्याने ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. तसे काहीच झाले नसून दिवसभर चांगलेच उन्ह तापले.