गोंदिया व चंद्रपूर विदर्भात सर्वांत ‘हॉट’; तापमान ४३.२ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 07:59 PM2023-06-12T19:59:34+5:302023-06-12T20:05:01+5:30
Gondia News मृग नक्षत्र लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नसून उलट मे महिन्यापेक्षा जास्त उन्ह आता पडत आहे. यामुळेच सोमवारी (दि. १२) गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३.२ अंशांवर होते व दोन्ही जिल्हे विदर्भात सर्वात ‘हॉट’ ठरले.
गोंदिया : मृग नक्षत्र लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नसून उलट मे महिन्यापेक्षा जास्त उन्ह आता पडत आहे. यामुळेच सोमवारी (दि. १२) गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३.२ अंशांवर होते व दोन्ही जिल्हे विदर्भात सर्वात ‘हॉट’ ठरले.
जून महिन्याचे १२ दिवस लोटूनही पावसाने पाहिजे तशी हजेरी लावली नाही. रविवारी जिल्ह्यातील तिरोडा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मात्र अन्य भागात पावसाने हजेरी लावली नाही. दररोज ढग दाटून येत असल्याने आता पाऊस बरसणार असे दिसत असतानाच पाऊस हुलकावणी देत आहे. परिणामी उन्हाची लाही कमी झाली नसून मे महिन्यापेक्षा जास्त तापमान आता नोंद केले जात आहे. रविवारी (दि. १२) गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक ४३.२ अंश नोंदले गेले. हे दोन जिल्हे विदर्भात प्रथम क्रमांकावर होते. तर अकोला जिल्ह्याचे तापमान ४२.८ अंशावर असल्याने अकोला दुसऱ्या तसेच ४२.७ अंश तापमानाने ब्रह्मपुरी तिसऱ्या क्रमांकावर होते.
वादळवारा व पावसाचा अंदाज
- हवामान खात्याने रविवारपासून गुरुवारपर्यंत पाऊस व वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, तिरोडा व अर्जुनी-मोरगाव भागात बरसलेल्या पावसामुळे काही प्रमाणात त्यांचा अंदाज खरा ठरला. मात्र दररोज पावसाचा अंदाज व्यक्त करूनही अवघ्या जिल्ह्याला पावसाने व्यापले नाही. आता परत हवामान खात्याने वादळीवारे व पावसाचा अंदाज वर्तविला आहे.