Maharashtra Election 2019; गोंदिया जिल्ह्यात तरुण चेहऱ्याला संधी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:19 AM2019-10-10T11:19:47+5:302019-10-10T11:20:17+5:30
राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराचे भवितव्य निश्चित करण्यात तरुण मतदारांची महत्त्वाची भूमिका असते. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील तरुण मतदारही येथील राजकारण्यांचे भवितव्य ठरवतील. त्यामुळे सर्वच मार्गाने तरुण मतदारांना आपआपल्या पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहेत. मात्र या सगळ्या राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना थेट राजकारणात संधी देण्याबाबत त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.
सर्वच राजकारण्यांना व राजकीय पक्षांना तरुणांची मते हवी आहेत. प्रचारासाठी तरुण कार्यकर्ते, तरुण पदाधिकारी हवे आहेत. मात्र थेट राजकारणामधील त्यांचा समावेश करण्यासाठी मात्र पक्ष उदासीन दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार इच्छुक असतांना या उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोपही तरुणांकडून होत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि नोकरी या सर्व प्रश्नांना हत्यार करुन त्याबाबत कार्यक्रम घेवून राजकीय पक्ष पुढे येतात. तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून निवडणूक जिंकतात.मात्र पुढील पाच वर्ष त्याची अंमलबजावणी कितपत होते हा देखील संशोधनाचा विषय आहे. तरीही तरुणांना राजकारण आणि राजकारणाविषयी आकर्षण कमी झालेले दिसून येत आहे. रोजगार, नोकरी याबाबत नेहमीच राजकारणी, राज्यकर्ते, राजकीय पक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येते. राजकारणासारख्या क्षेत्रात तरुणांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांबाबत मोठ्या प्रमाणात राजकारणांमध्ये उदासिनता आहे.
निवडणुकीच्या तोंडावार तरुणांच्या बेरोजगारी, अशिक्षितपणा व गरीबीचा फायदा घेत निवडणुकीपुरता त्यांचा वापर करुन घेतला जातो. तरुणांचे ध्येय केवळ झेंडा हातात घेणारा, काहीसा उपद्रवीमूल्य असणारा आणि मौजमजा करण्यासाठी वेळ घालविणारा असे गृहीत धरुनच निवडणुकीसाठी तरुण वर्गाचा वापर केला जातो. राजकीय पोळ्या भाजण्यात मशगुल असणारे राजकीय पक्ष आणि राजकारणी हे तरुणांच्या प्रश्नांचे भांडवल करतात शिवाय तेही कमी पडले तर जात, धर्म व आरक्षण अशा भावनिक मुद्यांवर हात घालून तरुणांचे डोके भडकविण्याचे काम केले जाते. काही राजकारणी धर्मांध संघटनाचे नेते हे त्यासाठी काहीही करण्यास मागे पुढे पाहत नाही. ग्रामपंचायतीमध्ये एखादा सुशिक्षीत तरुणाने यायचे म्हटले की, राजकारण हे तुझे काम नाही, राजकारण करण्यापेक्षा आपले करिअर घडव असे फुकटचे सल्ले देऊन तरुणांना राजकारणापासून परावृत्त केले जाते. तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे. तरुण राजकारणांमध्ये आल्यास व त्यांना योग्य पाठबळ मिळाल्यास किंवा सकारात्मक दिशा मिळाल्यास त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळू शकेल. आजची तरुण पिढी ही केवळ सोशल मीडीयावर प्रतिक्रिया देणारी नसून ती संघटीत होऊ शकते. त्यामुळे या तरुणपिढीकडे राजकीय व सामाजिक परिवर्तनाची ताकत आहे. ती नाकारता येणार नाही. आजची तरुण पिढी ही विज्ञान युगात वावरणारी असल्याने ती देशाच्या भवितव्याबाबत गंभीर राहून अनेक अभिनव उपक्रम व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन राजकारण हे प्रगतीचे व्यासपीठ बनवू शकते.