गोंदिया : अवैध धंद्याच्या उच्चाटणासाठी गोंदिया जिल्ह्यात पोलीस अधिक्षकांचे विशेष पथक फिरत आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नंगपूरा मुर्री येथील ११ लाख ७७ हजाराची सुंगधीत तंबाखू व गुटखा या विशेष पथकाने पकडला. यात एक ट्रकही ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई ८ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. सुगंधित तंबाखू व वाहनासह २७ लाख ३६ हजार २४७ रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वात ८ डिसेंबर रोजी पोलिस ठाणे गोरेगाव हद्दीत धाड टाकून आरोपी राजेश बुधाराम राजगडे (२६) रा. सिव्हील लाईन, गोविंदपूर, गोंदिया व मासुम चंदु आसवानी (२४) रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया या दोघांचे मालवाहक (एम.एच. ३५ ए.जे. २०७७) जप्त करण्यात आले.
या वाहनाची तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू असा ९ लाख ५८ हजार ६०० रूपयाची तंबाखू, मालवाहक किंमत ६ लाख जप्त करण्यात आले. तसेच गोंदिया शहर हद्दीतील नांगपुरा मुर्री येथील गोदामातून विनापरवाना साठवणूक करून ठेवलेला गुटखा, व तंबाखू एकूण किंमत ११ लाख ७७ हजार ६४७ रूपयाचा माल असा एकूण किंमत २७ लाख ३६ हजार २४७ रूपयाचा माल मिळून आला.
या प्रकरणात राजेश बुधाराम राजगडे (२६) रा. सिव्हील लाईन, गोविंदपूर, गोंदिया व मासुम चंदु आसवानी (२४) रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरीता अन्न औषध प्रशासन विभागास पत्रव्यवहार करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवळेकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पोलीस हवालदार सुजित हलमारे, महेश मेहर, पोलीस नायक शैलेषकुमार निनावे, पोलीस शिपाई सन्नी चौरसिया, दया घरत यांनी केली आहे.