गोंदियाला ४५० रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:08+5:302021-04-28T04:32:08+5:30
गोंदिया : कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. मात्र गोंदियाला नियोजित ...
गोंदिया : कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. मात्र गोंदियाला नियोजित कोट्यापेक्षा कमी इंजेक्शन प्राप्त होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची या इंजेक्शनसाठी पायपीट सुरू होती. ही बाब लक्षात घेत आ. विनोद अग्रवाल यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय कोसे व लोहकरे यांच्याशी चर्चा करून गोंदियाला आवश्यकतेनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी गोंदियाला ४५० रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले.
रेमडेसिविर इंजेक्शनसह १९८० फॅव्हीपीरावीर (फॅबीफ्लू) स्ट्रिप सुद्धा प्राप्त होणार. आठ दिवसांपूर्वी कोरोनावरील हे औषध मिळत नसल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले होते. दरम्यान आ. अग्रवाल यांनी या गोळ्यांचे उत्पादन करणाऱ्या मायलन कंपनीच्या मालकांसोबत ईलीयाज यांच्यासह चर्चा केली. फॅव्हीपीरावीर (फॅबीफ्लू) स्ट्रिप तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ईलीयाज यांनी दिले. त्या अनुषंगाने ८०० एमजीचे १९८० फॅव्हीपीरावीर (फॅबीफ्लू) स्ट्रिपचे बिलिंग केले असून बुधवारी (दि.२८) त्या गोंदियाला पोहच होणार असल्याचे ईलीयाज यांनी आमदार अग्रवाल यांना सांगितले. यापुढे देखील गोंदियाला गरजेनुसार फॅव्हीपीरावीर(फॅबीफ्लू) स्ट्रिपचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे आ. अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे आता रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोरोनावरील औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागणार नाही.