गुड न्यूज...घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास मोफत रेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:24 PM2021-01-22T12:24:49+5:302021-01-22T12:26:56+5:30

Gondia News शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील चार रेती घाट राखीव ठेवण्यात आले आहेत.

Good news ... Gharkul beneficiaries will get five brass free sands | गुड न्यूज...घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास मोफत रेती

गुड न्यूज...घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास मोफत रेती

googlenewsNext
ठळक मुद्दे चार रेती घाट राखीव ४० हजार लाभार्थ्यांना दिलासा

 लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : राज्य पर्यावरण समितीची न मिळालेली मंजुरी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. याचा फटका सर्वच निर्माधीन बांधकामांना बसला. यामुळे सर्वाधिक अडचणीत घरकुल लाभार्थी आले होते. मात्र, आता शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील चार रेती घाट राखीव ठेवण्यात आले आहेत.

शासनाच्या रमाई आवास, पंतप्रधान आवास इतर घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जाते. याच योजनांतर्गंत ८३२३० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते. यापैकी ३७१४५ लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रेतीअभावी मागील वर्षभरापासून ठप्प पडले होते. घरकुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने त्यांना बांधकामाची देयके मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. काही लाभार्थ्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत १० ते १५ हजार रुपये मोजून रेती खरेदी केली. मात्र, सर्वांनाच हे शक्य नाही. घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना देयके न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली होती, तर काही लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे या लाभार्थ्यांनी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर आता उशिरा का होईना प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना प्रती लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील ४० हजारांवर लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

हे चार रेतीघाट ठेवले राखीव

जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यासाठी चार रेती घाट राखीव ठेवण्यात आले आहेत. तिरोडा तालुक्यातील मांडवी, गोंदिया तालुक्यातील बनाथर, सालेकसा तालुक्यातील ननंसरी हे रेती घाट राखीव ठेवण्यात आले असून, घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रत्येक तहसील कार्यालयाला दिले आहेत.

रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातील २८ रेती घाटांचे लिलाव न झाल्याने जिल्ह्यातील हजारो बांधकामे अडचणीत आली होती. घाटांचे लिलाव न झाल्याने जिल्हा प्रशासनाचा २५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता. आता रेती घाटांच्या लिलावांना हिरवी झेंडी मिळाली असून, लवकरच लिलावासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पोखरलेल्या घाटांसाठी सारेच अनुत्सुक

जिल्ह्यातील २८ पैकी २४ रेती घाटांच्या लिलावासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात रेती घाट पोखरलेले असल्याने त्यांच्या लिलावासाठी कुणी कंत्राटदार पुढे आले नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांना निविदा काढण्यात येणार आहे.

शासन आदेशानुसार जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म विभागाने पंधरा दिवसांपूर्वीच सर्व तहसील कार्यालयांना दिले आहेत. रेती उपलब्ध करून देण्याचे काम काही ठिकाणी सुरूदेखील झालेे आहे.

- सचिन वाढिवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, गोंदिया.

Web Title: Good news ... Gharkul beneficiaries will get five brass free sands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू