गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता, राज्यात विविध खेळ व प्रशिक्षणांवर घालण्यात आलेली बंदी बघता, खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र, आता त्यांच्यासाठी ‘गुड न्यूज’ असून, सोमवारपासून (दि.१८) विविध खेळ व प्रशिक्षणांवरील ही बंदी हटवून त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हे सर्व करताना शासन व क्रीडा विभागाकडून कोविड १९ संदर्भाने वेळोवेळी प्राप्त सूचना, निर्देश, मानक कार्यप्रणालीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोविड १९ साथरोगअंतर्गत मिशन बिगीन अगेन अंतर्गत वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा सीमा क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन वगळून) आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय क्रीडापटूकरिता प्रशिक्षण, खेळ, स्पर्धा इत्यादी सोमवारपासून (दि.१८) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यशदा, वनामती, मित्रा, मेरी इत्यादी प्रशिक्षण संस्थांमार्फत आयोजित शासकीय कार्यालयीन प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारपासून सुरू करण्यास मुभा असेल. तथापि, याकरिता शासन व क्रीडा विभागाकडून कोविड १९ संदर्भात वेळोवेळी प्राप्त सूचना, निर्देश व मानक कार्यप्रणालीचे पालन करणे, सर्व संबंधितांना बंधनकारक राहणार आहे. या आदेशांचे पालन न करणारी-उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मीना यांनी कळविले आहे.