गोरेगाव शहर होणार टँॅकरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 09:51 PM2019-06-21T21:51:47+5:302019-06-21T21:52:28+5:30
गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण आठ वार्डात सध्या टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योनजा अपयशी ठरल्यानंतर न.प.ने स्वत: पाणी पुरविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. त्या दिशेने शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच नगर पंचायतच्या वतीने शहराला पाणी पुरवठा होणार आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण आठ वार्डात सध्या टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योनजा अपयशी ठरल्यानंतर न.प.ने स्वत: पाणी पुरविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. त्या दिशेने शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच नगर पंचायतच्या वतीने शहराला पाणी पुरवठा होणार आहे.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजना गेल्या दहा वर्षापासून गोरेगाव शहरात कार्यान्वित आहे. पण वरिष्ठांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला कायमची घरघर लागली. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे, दिवा स्वप्न ठरत असतांना चक्क नगर पंचायतीला स्वत:चे टँकर लावावे लागले. वर्षानू-वर्षापासून फुटलेल्या पाईप लाईन व त्या पाईप लाईन मधून होणारी लाखो लिटर पाण्याची गळती आदी समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी त्यावर मंथन करीत त्यांनी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नगर पंचायतला हस्तांतरीत करण्याची मागणी केली. त्या दिशेने आता गोरेगाव शहरात पाईप लाईन टाकण्यासाठी सर्वेक्षण सुरु आहे. पाईप लाईनचा अंदाजीत खर्च, शासन दरबारी मांडल्यावर मंजुरी घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात संपूर्ण अहवाल प्रशासनाकडे मांडल्यावर पाणी पुरवठा योजना न.प.ला हस्तांतरीत होणार आहे. गोरेगाव नगर पंचायतची अकरा हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी दहा वर्षापूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या मोठा गाजावाजा करण्यात आला. घरोघरी नळाचे कनेक्शन देण्यात आले. पण मुबलक पाण्याचा नादात अनेकांनी टुल्लू पंप लावल्याने अनेक ग्राहकांना पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागले.
पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार
हलबीटोला, श्रीरामपूर या दोन वार्डात जानेवारी महिन्यापासून न.प.ने टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. या दोन वार्डात प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी नाही त्यामुळे येथे दरवर्षी येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
आठ वार्डात पाणी टंचाई
ऐन उन्हाळ्यात पाण्याची भिषण टंचाई लक्षात घेत नगरपंचायतने टँकर द्वारेपाणी पुरवठा केला पण कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी न.प.ने ठोस पाऊले उचलीत आहेत. पाणी समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे भविष्यात निदान या वार्डात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही.
गोरेगाव शहरातील प्रमुख आठ वार्डात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते.सर्व नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे म्हणून प्रशासनाकडे पाणी पुरवठा योजनेचा खर्च प्रस्तावित करणार आहे. सध्या युध्दपातळीवर काम सुरु आहे. अंदाजपत्रक दाखल केल्यावर प्रशासनाकडून मंजुरी प्राप्त होईल.त्यानंतर पाणी पुरवठा नगरपंचायतच्या माध्यमातून केला जाईल.
- आशिष बारेवार, नगराध्यक्ष न.प.गोरेगाव