शासन निर्णयाचा २५० अंगणवाडी सेविकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:43 AM2018-03-14T00:43:41+5:302018-03-14T00:43:41+5:30
राज्य सरकारने अंगणवाडीे सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : राज्य सरकारने अंगणवाडीे सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला आहे. या निणर्याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील १५० अंगणवाडी सेविका आणि ९५ मदतनीस यांना बसला असून त्यांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी तसेच कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी १९७५ पासून एकात्मीक बालविकास योजनेतंर्गत राज्यात अंगणवाड्यांची सुरूवात करण्यात आली. यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकारकडून ४० टक्के निधी दिला जातो. यातूनच अंगणवाडी सेविकांचे मानधन आणि इतर खर्च केला जात होता. ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात अंगणवाड्यांमुळे माता मृत्यू, बाल मृत्यू, कुपोषण आदीवर नियंत्रण मिळविण्यात बºयाच प्रमाणात यश आले होते. तसेच अंगणवाडी केंद्राच्या माध्यामातून गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींना सकस आहार दिला जात होता. बालकांमध्ये लहानपणापासून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यास मदत होती. अंगणवाडी आणि मिनी अंगणवाड्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. मात्र राज्य सरकारने नुकताच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निणर्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांचे वय ३१ मार्च २०१८ ला ६० वर्षे पूर्ण होत आहे. त्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्याचे निर्देश महिला व बाल कल्याण अधिकाºयांना दिले आहे. या निणर्याचा फटका जिल्ह्यातील १५० अंगणवाडी सेविका आणि ९५ मदतनिस यांना बसला आहे. ऐन वृध्दावस्थेत रोजगार हिरावला गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाबद्दल अंगणवाडी सेविकांमध्ये रोष व्याप्त आहे.
अंगणवाड्यांचे समायोजन
ज्या अंगणवाड्यांमधील बालकांची संख्या १५ पेक्षा कमी आहे अशा अंगणवाड्याचे जवळच्या अगंणवाडीमध्ये समायोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या बंद होण्याचीे शक्यता असून अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा रोजगार हिरावला जाण्याची शक्यता आहे.
रिक्त पदे न भरण्याचे आदेश
जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांची शेकडो पदे मागील वर्षभरापासून रिक्त आहे. ती पदे अद्यापही भरण्यात आलेली नाही. उलट सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केल्याने २५० पदे पुन्हा रिक्त होणार आहे. मात्र रिक्त असलेली पदे सध्या न भरण्याचे निर्देश शासनाने महिला व बालकल्याण विभागाला दिल्याची माहिती आहे.