शासनाचे आदेश निघाले आम्हाला नाही मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:47 AM2018-06-06T00:47:18+5:302018-06-06T00:47:18+5:30
शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मात्र यासंबंधीचे आदेश अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाकडे पोहोचले नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अजूनही ५५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा केला जात असल्याने ते अडचणीत आले आहे. परिणामी शासनाचे आदेश निघाले, आम्हाला नाही मिळाले अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
मागील वर्षी राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे शासनाने शासकीय हमीभावाने तुरीची खरेदी केली. तर तूर खरेदीवरुन बराच वाद देखील निर्माण झाला होता. खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी सरकारी गोदामात सुध्दा जागा नव्हती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने तुरीची भरडाई करुन तुरडाळ तयार केली.
त्यानंतर या तुरडाळीचा ५५ रुपये प्रती किलो दराने स्वस्त धान्य दुकान, सहकारी संस्था, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, ग्राहक सोसायट्यांना पुरवठा केला.
मात्र खासगी बाजारपेठेत तुरडाळीचे दर घसरल्याने ५५ रुपये प्रती किलो तुरडाळीला ग्राहकांची मागणी नव्हती. शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात तुरडाळीचा साठा असल्याने सरकारसमोर सुध्दा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वस्त धान्य दुकानदारांना ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती सर्वांपर्यंत पोहचलीे.
त्यामुळे शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकारांना ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचे मागणी करीत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना अद्यापही या दराने तुरडाळीचा पुरवठा झाला नसल्याने त्यांना शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे शिवचरण कापगते, किशोर वैद्य, उध्दव परशुरामकर या स्वस्त धान्य दुकानदारांनी लोकमतशी बोलताना सांगितले.शासनाने यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली.
स्वस्तधान्य दुकानदारांची पुरवठा विभागाकडे धाव
३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचे आदेश अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पुरवठा विभागाकडून ५५ रुपये प्रती किलो दरानेच स्वस्त धान्य दुकानदारांना तुरडाळीचा पुरवठा केला जात आहे. मात्र शासनाच्या घोषणेमुळे शिधापत्रिकाधारक ५५ रुपये प्रती किलोची तुरडाळ घेण्यास तयार नाही. तर आम्ही ५५ रुपये प्रती किलोप्रमाणे डाळीचे पैसे भरले मात्र त्यानंतर शासनाचे नवीन आदेश धडकल्यास आमचे नुकसान कोण भरुन देणार असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यानंतर यातील फरकाची रक्कम कपात करुन तेवढी तुरडाळ स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे कुठलेही नुकसान होणार नाही.
- ए.के.सवई, जिल्हा पुरवठा अधिकारीे, गोंदिया.
शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचे आदेश पोहचण्यास तीन महिने लागले होते. तिच स्थिती आता तुरडाळीच्या बाबतीत होणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- डॉ.अविनाश काशिवार, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, डव्वा.