धान साठवणुकीतील घट मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:41 PM2018-09-27T23:41:32+5:302018-09-27T23:42:00+5:30
आधारभूत हमीभाव धान खरेदी योजना पूर्व विदर्भातील भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात सुरु आहे. सहकारी संस्था धानाची हमी भावानुसार खरेदी करतात. खरेदी केलेला धान उघड्यावर न ठेवता गोदामात सुरक्षीत ठेवण्यात येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : आधारभूत हमीभाव धान खरेदी योजना पूर्व विदर्भातील भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात सुरु आहे. सहकारी संस्था धानाची हमी भावानुसार खरेदी करतात. खरेदी केलेला धान उघड्यावर न ठेवता गोदामात सुरक्षीत ठेवण्यात येतो. मात्र शासनाकडुन धानाची उचल उशिरा होत असल्याने प्रती क्विंटल ८ किलो धानाची घट येते.
त्यामुळे संबंधित संस्थाना याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने धानातील घट मंजुर करण्याची मागणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे सदस्य रेखलाल टेंभरे यांनी केली. टेंभरे म्हणाले सन २००९-१०,२०१०-११ या वर्षात भरडाईसाठी धानाची उचल उशिरा झाल्याने धान ४५ महिन्यापर्यंत गोदामात पडुन होते.
त्यामुळे धानात ८ किलो प्रती क्विंटल घट आली. यात वाहतूक, व भरडाई दर वाढवून मिळायला पाहिजे. सीएमआर तांदुळामध्ये ३२ टक्के पर्यत कणीचे प्रमाण वाढवून देण्याची मागणी केली. सन २०११ ते २०१७-१८ या वर्षात १५ महिन्यापर्यंत शासनाने धानाची उचल केली नाही. यात १ टक्के घट केंद्र शासनाने मंजुर केली. मात्र राज्य सरकारने ही घट मंजुर केली नाही.
शासनाजवळ सीएमआर तांदूळ ठेवण्यासाठी पुरेशे गोदाम उपलब्ध नाहीत. त्यामुळे भरडाईला उशिरा होत आहेत. ७ वर्षात झालेली घट शासनाने मंजुर करावी. तसेच शासन गोदाम भाडे प्रती क्विंटल २ रु पये ४० पैसे देते ते मात्र भाडे केवळ दोनच महिन्यासाठी दिले जाते. हे शासनाचे धोरण चुकीचे असल्याचा आरोप टेंभरे यांनी केला. खरीप हंगाम ६ महिने चालतो व रब्बी हंगाम ३ महिने चालत असल्याने धान खरेदी सुरु राहते. गोदामात धान साठवून असेपर्यत मालकाला गोदाम भाडे मिळाले पाहीजे अशी मागणी टेंभरे यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेला अध्यक्ष नामदेव कापगते, सदशिव खेत्रे, भेरिसंग नागपुरे,रेखलाल टेंभरे,घनश्याम खेडीकर, महेन्द्र मने, दामोदर मिसार, रमेश चुऱ्हे, रमेश गौतम उपस्थित होते.