घरगुती कारणातून गळा दाबून बायकोला केले ठार, खून करण्यापूर्वी सासऱ्याला केला फाेन; म्हणाला...

By नरेश रहिले | Published: December 20, 2023 07:46 PM2023-12-20T19:46:19+5:302023-12-20T19:47:19+5:30

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

He killed his wife by strangulation due to domestic reasons, before murdering he called his father-in-law | घरगुती कारणातून गळा दाबून बायकोला केले ठार, खून करण्यापूर्वी सासऱ्याला केला फाेन; म्हणाला...

घरगुती कारणातून गळा दाबून बायकोला केले ठार, खून करण्यापूर्वी सासऱ्याला केला फाेन; म्हणाला...

गोंदिया : घरातील क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीची बचावाची झाल्याने नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजतादरम्यान सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम टोयागोंदी येथे घडली. आशा केवल नेवरा (३२, रा. टोयागोंदी) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

आशाचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. आशाला केवल पासून एक मुलगा ९ वर्ष व एक तीन वर्षाची मुलगी आहे. आशाही आठ दिवसापूर्वी माहेरी राहून १० डिसेंबर रोजी सासरी टोयागोंदी येथे आली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आरोपी केवलने आपले सासरे गोपाल सूरदेव निर्मलकर यांना फोन करून आशाला आठ-पंधरा दिवसांसाठी तुमच्याकडे पाठवत आहे, असे म्हटल्यावर कोणासोबत पाठवता, असे सासऱ्याने विचारले. बस्स.. मी पाठवतो असे बोलून केवल गप्प राहीला. त्यावर सासरा गोपाल निर्मलकर यांनी माझ्या मुलीला एकटी पाठवू नका; आपण सोडून द्या असे म्हटले. एवढे बोलल्यावर केवलने आशाला फोन दिला.

 गोपाल यांनी आशा सोबत चर्चा केल्यावर मला एकटीच माहेरी जायला सांगत आहेत आणि माझ्या मुलांनाही माझ्यासोबत पाठवत नाही असे आपल्या वडीलाला सांगितले. मुले कुठे आहेत हे विचारल्यावर त्या मुलांना सासू फिरायला घेऊन गेली असे आशाने सांगितले. त्यानंतर गोपाल यांनी फोन आपल्या पत्नी रमौतीन यांच्याकडे फाेन दिला. मायलेकीच्या बोलण्यातही मुलांसोबत पाठवतील तर मी माहेरी येईल अन्यथा मी माहेरी येणार नाही असे आशाने म्हटले. दुपारी ३:१५ वाजता आशाच्या सासऱ्याने नवीन नंबरने फोन करून आशाचा खून झाल्याची माहिती दिली. आशाचे माहेरचे मंडळी रात्री ९ वाजता टोयागोंदी येथे पोहचल्यावर दुपारी दीड वाजता आशाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पुढे आली. आशाचे वडील गोपाल सूरदेव निर्मलकर (६५, रा. उरई-डबरी, डोंगरगड- छत्तीसगड) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.

सितलालच्या संवादातून त्यांच्या घरात वाद झाल्याचा संशय
आशाचे सासरे सितलाल नेवरा यांनी आशाचे वडील गोपाल यांच्याशी फोनवर संवाद केला त्या संवादात नेवरा कुटुंबियांत वाद झाला असावा असा संशय घटनेच्या पूर्वीच गोपाल यांना आला होता. परंतु काही विचारणार यापूर्वीच आशाच्या सासऱ्याने फोन लगेच बंद केला. त्यामुळे आशाघरी काय घडले, कशामुळे जावई मुलीला माहेरी पाठविण्याची गोष्ट करतो हे काहीच कळले नाही. परिणामी खून झाल्याची बातमीच कानावर पडली.

सहा तासातच मुलीच्या खुनाची बातमी
सकाळी ९ वाजता तब्बल १० ते १५ मिनीटे संवाद झाल्यानंतर त्यांच्या घरात वाद झाल्याची कुणकुण लागली. संवाद झाला, जावई ऐकेना, तिचा सासरा बोलेना, सासू लहान मुलांना घेऊन घराबाहेर गेली आणि आशाला अश्रृ आवरत नव्हते. या एकंदरीत प्रकरणावर वेळेनुसार प्रकरण शांत होईल असे माहेरच्यांना वाटत होते. परंतु तब्बल सहा तासाने मुलीचा खून झाल्याची बातमी कानावर पडली अन् माहेरच्या सर्व लोकांना अश्रृ अनावर झाले.

Web Title: He killed his wife by strangulation due to domestic reasons, before murdering he called his father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.