गोंदिया : ग्रामीण दारिद्रयाचे समूळ उच्चाटण करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी ग्रामीण गरीबांना एकत्र आणून त्यांचा विकास करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गरिबांच्या या सक्षम संस्था उभारणे, सदर संस्थामार्फत गरीबांना विस्तीय सेवा पुरविणे, गरीबांची व त्यांच्या संस्थांची क्षमता वृद्धी व कौशल्यवृद्धी करणे आणि शाश्वत उपजिविकेची साधणे उपलब्ध करून देवून त्यांचे राहणीमान उंचावून दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.या अभियानाच्या पूर्वी सुवर्ण ग्राम जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये स्वयं सहायता गटांसाठी पंचसूत्रीची आखणी करण्यात आली होती. सदर नवीन अभियानामध्ये शासनाने पुढे जावून स्वयं सहायता समूहांकरिता ‘दशसूत्रीची’ योजना कार्यान्वित केली आहे. नवीन अभियानामध्ये स्वयं सहायता गटातील महिला व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, पंचायत राज संस्थांबरोबर सहभाग, शासकीय योजनांमध्ये नियमित सहभाग व शाश्वत उपजीविकेसाठी उपाययोजना या पाच बाबींची नव्याने भर घालण्यात आली.त्या अनुसंगाने पं.स. गोंदिया मार्फत सेमी इंटेन्सीव कार्यक्षेत्रातील ग्रा.पं. खर्रा येथे स्वयं. सहायता समुहाचे आरोग्य जाणीव जागृती कार्यक्रम पूर्व माध्यमिक शाळेत पं.स. गोंदियाचे तालुका समन्वयक जितेंद्र बिसेन यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. सदर कार्यक्रमात खर्रा गावातील सहा स्वयं सहायता गटांच्या ४५ महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक एमएसआरएलएमचे तालुका समन्वयक जितेंद्र बिसेन, पाणी पुरवठा विभागाचे तालुका समन्वयक ओ.एस. चौधरी, श्रीमती एम.बी. बिसेन व प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडीचे बी.एस. घोसवाडे हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलनाने झाली. जितेंद्र बिसेन यांनी आरोग्याचे मानवी जीवनातील महत्व, आरोग्य हिनतेचे कारण, अस्वच्छता, आहार विकृती, पोषक आहाराचा अभाव, निकृष्ट राहणीमान, अंधश्रद्धा, गरीबी यावर मार्गदर्शन केले. गरीबी व आरोग्य यांचे घनिष्ट संबंध असल्याचे सांगून चांगल्या आरोग्याचे उपाय सांगितले. चौधरी यांनी चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता, पाण्याची शुद्धता व शौचालयाचे महत्व या बाबत मार्गदर्शन केले. बिसेन व घोसवाडे यांनी लहान बालके, गर्भवती स्त्री व महिलांचे आरोग्य या बाबत माहिती देवून शासनाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सोईसुविधा व आरोग्य कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली. खर्रा हे गाव अनुसूचित जमातींचे बहुसंख्य असलेले गाव आहे. उपस्थित महिलांना बालके व महिलांच्या कुपोषणाबाबत जागृत राहण्याबाबतचा सल्ला दिला. पावसाळा लगेच सुरू होत असून पावसाळ्यात रोगांचे प्रमाण फार वाढत असून त्यांची उपाय योजना म्हणून गावातील जन स्त्रोतांमध्ये क्लोरीन (ब्लीचिंग) टाकून क्लोरिनयुक्त पाणी पिणे अत्यावश्यक असल्याचे उपस्थितांना मार्गदर्शनात सांगण्यात आले.सदर कार्यक्रमात स्वयं सहायता समूहाच्या महिलांना ग्रामीण आरोग्य शिक्षण फार चांगल्या प्रकारे देण्यात आले. शेवटी गावातील आशा कार्यकर्ती जैवंता लामकासे यांनी मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमात जैवंता लामकासे यांनी मोलाचे सहकार्य केले.आरोग्य हे निव्वळ औषधीमध्ये नसून ते आरोग्याचे मूलभूत शिक्षण, जीवनशैली व जीवन पद्धती यामध्ये असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण जीवनात आरोग्याबद्दल फार अनभिज्ञता असून आरोग्य शिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे सूचित केले. ग्रामीण आरोग्यात दारिद्र्य हे फार मोठे कारणीभूत घटक असून दारिद्र्य निर्मूलनासाठी गरीबांच्या संस्था स्वयं सहायता समूहांना बळकट व सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
स्वयंसहायता बचत गटांचे आरोग्य जाणीव जागृती कार्यक्रम
By admin | Published: July 02, 2014 11:22 PM