गोंदिया : जिल्ह्यात कोरोना कहराला सुरुवात झाली असून, अशात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजनांसाठी धावपळ करताना दिसत आहे. यातच आता रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू झाली आहे. प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग केली जात असून, त्याचा रेकॉर्ड तयार केला जात आहे.
बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात अद्यापपर्यंत राज्य शासनाने प्रवासावर निर्बंध लावले नसल्याने प्रवासी सुविधा सुरूच आहे. यामुळे बाहेरून प्रवाशांचे आगमन होत आहे. ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाने आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पथक गठित करण्यात आले असून, २४ तास तपासणीचे कार्य सुरू राहणार आहे. यामध्ये दोन आरोग्य कर्मचारी असून, याशिवाय पोलीस कर्मचारी व रेल्वे पोलीस कर्मचारीही आहेत. येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जात असून, त्याची संपूर्ण माहिती नोंद केली जात आहे. अशात ज्या प्रवाशाच्या शरीराचे तापमान १०० डिग्रीपेक्षा जास्त येत आहे, त्यांना थेट केटीएस रुग्णालयात पाठविले जात आहे.