सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:39+5:302021-09-02T05:02:39+5:30
गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय माता-बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत १ ते ७ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय ...
गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय माता-बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत १ ते ७ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. पोषाहार आरोग्य प्रदर्शनीचे सविता विनोद अग्रवाल यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुशांकी कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, एस. एस. गर्ल्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठ प्रमुख डॉ. कविता राजाभोज, बीजीडब्ल्यूचे मेट्रेन गजानन खेडकर, डाॅ. पाटील, कार्यालय अधीक्षक अभिनय तराळे आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रीय पोषाहार सप्ताहाबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सविस्तर माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती आहे. त्यासाठी गर्भवतीच्या आहाराकडे कुटुंबीयांनी सुरुवातीपासून लक्ष दिले पाहिजे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी बाळाच्या आयुष्यातील प्रगतीचे एक हजार दिवस खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे पोषाहाराबाबत महिलांना साक्षर बनविणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येणार नाही व कुपोषणमुक्त गोंदियाचे स्वप्न साकार होऊ शकेल, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनआरसीचे स्टाफ स्वाती बावणकर यांनी केले. आभार सारिका तोमर यांनी मानले. अनिता राहुलकर, रजनी वैद्य यांनी सहकार्य केले.
.............
पोषणाच्या वाटेवर कुपोषणाची हार
या वर्षीच्या पोषाहार सप्ताहाचे घोषवाक्य ‘पोषणाच्या वाटेवर कुपोषणाची हार, करत स्थानिक आहाराचा स्वीकार’ याबाबत एनआरसी विभागाच्या आहार समुपदेशिका स्वाती बन्सोड यांनी उपस्थित माता-पालकांना विस्तृत माहिती दिली. या वेळी गर्भवती मातांचे हिमोग्लोबिन व कॅल्शियम लेवल वाढविण्यासाठी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी स्थानिक उपलब्ध आहारातून पोषक तत्त्वे कशी मिळविता येतात हे सोप्या भाषेत समजावून सांगितले. डाॅ. कविता राजाभोज यांनी पोषाहार साक्षरता ही काळाची गरज असल्याचे महत्त्व विशद केले.