सहा बालकांवर होणार हृदयशस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 09:28 PM2018-01-21T21:28:10+5:302018-01-21T21:29:22+5:30
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात शून्य ते १० वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विशेष शिबिर घेण्यात आले. यात सहा बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात शून्य ते १० वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विशेष शिबिर घेण्यात आले. यात सहा बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर आता मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या बालकांच्या आरोग्य शिबिरात तिरोडा शहर व ग्रामीण भागातून शेकडो बालके तपासणीसाठी आले होते. यात विविध शाखांमार्फत १५२ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात काही बालकांना हृदयरोग व इतर आजार असल्याचे आढळले. उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय चमूसह गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयातील सहा तज्ज्ञांची वैद्यकीय चमू बालकांच्या तपासणीसाठी उपस्थित होती.
शिबिरात १० बालकांची हृदयरोग तपासणी, सहा बालकांची कान, नाक व घसा तपासणी, ३० बालकांची सामन्य तपासणी, ३२ बालकांची नेत्र तपासणी, १५ मुलींची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, २१ बालरूग्ण तपासणी, १८ बालकांची दंत तपासणी, १० बालकांची अस्थीरोग तपासणी व १० बालकांची शस्त्रक्रियेसाठी तपासणी विविध तज्ज्ञांकडून करण्यात आली. यातील सहा बालकांची निवड हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
बालकांची तपासणी करणाºया तज्ज्ञ चमूमध्ये अस्थिव्यंगरोग तज्ज्ञ डॉ. विद्यासागर मोहन, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. संजय भगत, बालरोग तज्ज्ञ डॉ. रेखा दुबे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अनिल आटे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भारती रंगारी, नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. राऊत, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. खंडाईत, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुंभलकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. आशिष लोथे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल डगवार यांचा समावेश होता.
बालकांच्या तपासणीपूर्वी डॉ. खंडाईत व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम यांनी बालक, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी घाबरणाºया पालकांना समुपदेशन केले. तपासणीसाठी डॉ. निलेश लोथे, डॉ. प्रणव डोंगरे, डॉ. प्रिया ताजने, डॉ. श्रद्धांजली चौधरी, डॉ. आशिष बन्सोड, समुपदेशक गणेश तायडे, गुरूदास गिरीपुंजे, दीपक रणदिवे, कमलेश शुक्ला, सीमा पेरे, माया पटले, वंदना गौतम यांनी सहकार्य केले.
शस्त्रक्रियेची भीती केली दूर
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात केलेल्या तपासणीत सहा बालकांना हृदयरोग असल्याचे आढळले. या वेळी डॉक्टरांनी बालकांच्या पालकांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मात्र त्यासाठी बालकांसह पालकही घाबरले होते. भीतीपोटी पालकांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला होता. यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात आयसीटीसीचे समुपदेशक गणेश तायडे व आरबीएसकेचे समन्वयक संजय बिसेन यांनी समुपदेशन केल्यानंतर सहा बालक व त्यांचे पालक हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी तयार झाले.