गोंदिया : हवामान खात्याने दिलेला अंदाज यंदा तंतोतंत खरा ठरला असून मंगळवारी (दि.१६) रात्री सुमारे ९.३० वाजतादरम्यान जिल्हयात पावसाला सुरुवात झाली तर बुधवारीही (दि.१७) सकाळपासूनच धो-धो पाऊस बरसला. या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच पावसामुळे थंडीचा जोर वाढला असून पुन्हा गरम कपडे काढावे लागले आहेत.
हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज दिलेला होता. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत असे काहीच वातावरण दिसले नाही व पाऊस येणार असे वाटत नव्हते. मात्र रात्री सुमारे ९.३० वाजतादरम्यान अचानकच पावसाच्या सरी कोसळल्या व त्यानंतर चांगलाच पाऊस बरसला. बुधवारीही पावसाने सकाळपासूनच दुपारपर्यंत चांगलीच हजेरी लावून जिल्हयाला झोडपून काढले. दुपारी पावसाने उघाड दिली असली तरीही ढगाळ वातावरणामुळे पावसाळा सुरू झाल्यासारखे वाटत होते. शिवाय थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांना पुन्हा गरम कपडे व रेनकोट काढावे लागले. या पावसामुळे मात्र रब्बी पीक तसेच खरेदी केंद्रांवर बाहेर पडून असलेल्या धानाला धोका निर्माण झाला आहे.