ओव्हरलोड वाहतुकीचा परिणाम : खासगी बसचे २० प्रवासी जखमी, वाहनचालकही गंभीरदेवरी : लगतच्या छत्तीसगड राज्यातील छुरीयावरून ककोडी-चिचगड-देवरी मार्गावरील आरटीओचा कर वाचविण्याकरिता ओव्हरलोड (जड) वाहनांच्या आवागमनाचा परिणाम गुरूवारी सकाळी ८.१५ वाजतादरम्यान या मार्गावरील वडेकसा वळणावर बघावयास मिळाला. येथे एक खाजगी प्रवासी बस व ओव्हरलोड (जड) वाहनाच्या आमोरासमोरील धडकेत ४० सीटर प्रवासी बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले. छत्तीसगड राज्यातील छुरीयावरून गुरूवारी सकाळी ८.१५ वाजता खाजगी ४० सीटर प्रवासी बस सीजी ०८/एम-३८२ ही ककोडी-चिचगड मार्ग देवरीकडे येत असता देवरीवरून आरटीओचा कर वाचविण्याकरिता एक ओव्हरलोड वाहन सीजी०४/जेसी-८३५७ ची या मार्गावरील वडेकसा वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत बसमध्ये बसलेले सुमारे ४० प्रवासी जखमी झाले. तर वाहनचालक संदेश भगवान यादव (२२,रा. सिकंदरपूर, बालीया) हा गंभीर जखमी झाला. या सर्वांना जवळील ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भर्ती करण्यात आले. या घटनेची माहिती चिचगड पोलिसांना आणि सहषराम कोरोटे यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते बळीराम कोटवार, चैनसिंग मडावी, जीवनलाल सलामे आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत केली. या घटनेची नोंद चिचगड पोलिसांनी केली असून वाहनचालक संदेश यादव याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. यात विशेष म्हणजे मागील अनेक दिवसापासून या एकतर्फी मार्गावरून दररोज शेकडो वाहन आरटीओचा कर वाचविण्याकरिता आवागमण करीत असतात. यामुळे या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील ओव्हरलोड वाहनांचे आवागमन थांबविण्याकरीता जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी शासनकर्त्यांना निवेदन देऊन आणि विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अजीनपर्यंत यांच्या या मागणीकडे शासनकर्त्यांनी जानूनबुजून दुर्लक्ष केले. या कारणामुळे आता या मागणीला धरून काँग्रेस पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा कोरोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
जड वाहनाची बसला धडक
By admin | Published: June 04, 2016 1:33 AM