आमगाव : मनात इच्छा शक्ती असेल तर कुठलेही ध्येय गाठणे शक्य होते. आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने यशस्वी वाटचाल करून पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आमगाव तालुक्यातील कातुर्ली येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले आहे.
एखाद्या व्यक्तीने निश्चय केला की मला हे व्हायचेच आहे, तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे सिध्द करून दाखविले आहे. एका लहानशा गावातील मुुलीने, जिद्द व चिकाटीने आज ती युवती पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. दूरदर्शनवर येणारी मालिका व वर्तमानपत्रातून प्रेरणा घेत आपण आज हे यश गाठले आहे. असे कार्तुली येथील मौसमी कटरे हिने सांगितले. मोसमी मोरेश्वर कटरे ही कातुर्ली या गावची आहे. आई शिक्षिका असून आजोबा सेवानिवृत्त शिक्षक आहेत. मौसमीने प्राथमिक शिक्षण गावीच जिल्हा परिषद शाळेत घेतले. लहानपणापासूनच मौसमीला आजोबा व आई बाबाचे मार्गदर्शन लाभले. दूरदर्शन या चॅनलवर ‘आरोहण’ ही मालिका प्रसारित होत असे, या मालिकेमध्ये नेव्हीचे प्रशिक्षण व नेव्हीमध्ये सैन्य अधिकारी कसे होतात, याचे प्रसारण होत असे. या मालिकेमुळे मौसमीला खाकी वर्दीचे वेड लागले. नेहमी आजोबा सांगत असे की मालिका बघत असताना टीव्हीवरच्या बातम्याही बघत जा, वर्तमानपत्र वाचत जा तसेच घरचे स्वातंत्र्य मिळाल्यानेच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी गोंदियाची निवड केली. प्रथम बीएड प्रशिक्षण करून पुढील शिक्षण घेण्यासाठी आईच्या मार्गदर्शनात एमपीएससीच्या पूर्वतयारीसाठी पुणे येथे गेली. पीएसआर बनणारच असा संकल्प घेऊन जिद्द व चिकाटीने अभ्यास करू लागली. या दरम्यान पीएसआयच्या पदाची जाहिरात निघाली. परंतु, या परीक्षेत मौसमीला यश मिळाले नाही. त्यानंतर २०१६ ला विविध पदाच्या दोन परीक्षा पास केल्या. मात्र खाकीचे वर्दीचे पद भूषविणार म्हणून तिने हे पद नाकारले व पुन्हा २०१७ ला पीएसआय पदाची जाहिरात प्रकाशित झाली. या परीक्षेत यश मिळाले. २०१९ ला महिलादिनी म्हणजे ८ मार्च रोजी परीक्षेचा निकाल आला. या निकालात मौसमीला यश मिळाले. २०२० ला तिने नाशिक येथे पीएसआय या पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. २०२१ या वर्षी ७ एप्रिलला नागपूर शहर येथे आपल्या पदावर रुजू झाली आहे. इतर युवतीही उंच शिखर गाठू शकतात, हे मौसमीच्या जिद्द व चिकाटीने करून दाखविले आहे.