आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Published: July 2, 2014 11:22 PM2014-07-02T23:22:25+5:302014-07-02T23:22:25+5:30
महाराष्ट्र शासनांतर्गत आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या देवरी प्रकल्पातील संपूर्ण अनु. आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन फेब्रुवारी २०१४ पासून थकीत आहेत. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांवर
गोंदिया : महाराष्ट्र शासनांतर्गत आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या देवरी प्रकल्पातील संपूर्ण अनु. आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन फेब्रुवारी २०१४ पासून थकीत आहेत. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांवर पाच महिन्यापासून उपासमारीची पाळी आली असून कर्मचाऱ्यांची आर्थिक विटंबना चालू आहे.
यासाठी अनेकदा संघटनेतर्फे अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना निवेदने व प्रत्यक्ष भेट देवूनसुद्धा जाणीवपूर्वक आदिवासी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. सदर प्रकल्प कार्यालय आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील लोकांच्या सर्वांगिण विकासासाठी स्थापन केलेले आहे. परंतु याठिकाणी चार महिन्यांपासून नियमित प्रकल्प अधिकारी नियुक्त नाहीत. भंडाऱ्याचे प्रकल्प आधिकारी यांच्याकडे देवरी प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार असूनसुद्धा त्यांनी एक महिन्यापासून प्रकल्प कार्यालयाला भेट दिलेली नाही. संघटनेच्या वतीने त्यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी संच नेहमीच बंद असतो.
येथील प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ पदांच्या पदोन्नतीचे काम पूर्ण रखडून पडले आहे. शालार्थ वेतन प्रणालीद्वारे माहिती देऊनसुद्धा सहा महिन्यापासून ही प्रक्रिया कार्यान्वित झालेली नाही. अनेक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पदांना कित्येक महिने लोटूनसुद्धा अप्पर आयुक्तालयाकडून कायम मान्यता मिळाली नाही. त्यामुळे वेतनाअभावी सदर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. कर्मचाऱ्यांना डीसीपीएस नंबर मिळालेले नाही. याला जबाबदार कोण? सदर प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या कित्येक अनु. आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या नियामित वेतनवाढी लावलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांनी वेळेवर एरीअर्स बिल सादर करुनही सदर एरीअर्स बिल गहाळ करुन जाणीवपूर्वक काही कर्मचाऱ्यांचे दोन वर्षापासून एरीअर्स बिल काढले नाही.
वैद्यकीय बिले अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयात धूळ खात पडलेले असतात. त्यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या समस्यांना संपूर्णपणे आदिवासी विकास विभाग व प्रकल्प कार्यालय देवरी येथील कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा जबाबदार आहे. सदर मागण्यांची पूर्तता ४ जुलै २०१४ पर्यंत करण्यात अनु. आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटनेतर्फे ५ जुलै २०१४ ला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
याबाबत संघटनेतर्फे सहायक प्रकल्प अधिकारी रघुते यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी आश्रमशाळा कर्मचारी संघटनेतर्फे सल्लागार पी.आर. भांडारकर, अध्यक्ष एस.आर. शर्मा, उपाध्यक्ष योजराज फुंडे, सचिव विलास सपाटे, प्रवक्ता जे.पी. खुणे, प्राचारक आर.एच. मेश्राम, सदस्य आर.एम. मारवाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)