नवेगावबांध येथे गृहभेट आपुलकीची मोहीम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:36+5:302021-05-06T04:30:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवेगावबांध : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत ‘गृहभेट आपुलकीची’ ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत ‘गृहभेट आपुलकीची’ ही मोहीम राबविण्यात आली. यात संजय गांधी निराधार योजनेतील विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. गावातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह अर्ज दाखल केले.
यावेळी नायब तहसीलदार एन. के. वाढई, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्रामविकास अधिकारी परशुराम चव्हाण व तलाठी पुंडलिक कुंभरे, रेवचंद तसेच तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
विशेष सहाय्य योजनेंतर्गत गृहभेट आपुलकीची या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी ८० पात्र लाभार्थ्यांपैकी ३६ लाभार्थ्यांचे अर्ज आज प्राप्त झाले तर उर्वरित लाभार्थ्यांचे अर्ज मंगळवारी येथील तलाठी कार्यालयात स्वीकारण्यात आल्याची माहिती तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांचे पात्र लाभार्थी तालुक्यात आहेत. परंतु, या योजनेविषयी माहिती नाही किंवा ते खूप गरीब आहेत. सध्या कोरोना काळात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थी हे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा लाभार्थ्यांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये दिनांक ३ मे ते ८ मे या कालावधीत हा उपक्रम राबविला जात आहे.
......
८ मेपर्यंत चालणार मोहीम
अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार के. एन. वाढई, भानारकर, मुनेश्वर गेडाम, मनिषा देशमुख व अव्वल कारकून आशा तागडे, लुचे, रिता गजभिये, स्थानिक तलाठी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी हे सेवा देत आहेत.
दिनांक ८ मेपर्यंत ही मोहीम तालुक्यात राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील गरीब व गरजू लाभार्थ्यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग दर्शवून ही मोहीम यशस्वी करावी.