घरकूल लाभार्थ्यांना रेती मिळणे झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:38+5:302021-01-21T04:26:38+5:30
तिरोडा : मागील वर्षी जिल्ह्यातील एकाही रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका घरकूल लाभार्थ्यांना बसला. रेतीअभावी ...
तिरोडा : मागील वर्षी जिल्ह्यातील एकाही रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका घरकूल लाभार्थ्यांना बसला. रेतीअभावी घरकुलाचे बांधकाम रखडल्याने त्यांची देयके अडकली होती. त्यामुळे त्यांची आर्थिककोंडी झाली आणि त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे प्रहार जनशक्ती जनशक्ती संघटनेने ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचा इशारा दिला होता. याचीच दखल घेत, महसूल विभागाने मंगळवारपासून घरकूल लाभार्थ्यांना रेती देण्यास सुरुवात केली आहे.
तिरोडा तालुक्यातील मांडवी व पिपरिया या दोन रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याचे पत्र तहसीलदार यांना दिले. त्यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्याशी चर्चा केली. सामान्य जनतेला लवकरात लवकर त्रास न होता, रेती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने स्वतः जेसीबी बोलावून घाटात ट्रॅक्टर जाण्याकरिता रस्ता तयार करून दिला. तेथील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या वतीने ट्रॅक्टर चालक व घरकूल लाभार्थी यांना मोफत रेती वाहतुकीचा परवाना देऊन रवाना करण्यात आले. घरकूल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळाल्याने सर्व घरकूल लाभार्थ्यांना तब्बल दहा महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. घरकूल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळावी, म्हणून प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, सचिव महेंद्रभाऊ नंदागवळी, तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचीच दखल महसूल विभागाने रेती देण्यास सुरुवात केली.