गोंदिया : महाराष्ट्रीय जेवणात रोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने जिल्ह्यातील गृहिणी हैराण झाल्या आहेत. आवडती तुरीची डाळ महागल्याने ती पुरवून पुरवून वापरण्यासाठी गृहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच उडीद, मूग व चना डाळही महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रीय जेवणात वरण, भात, भाजी व पोळी, असा नेहमीचा स्वयंपाक केला जातो. जेवण कोरडे वाटू नये, तसेच जेवणात प्रथिनांचा समावेश व्हावा यासाठी तुरीच्या डाळीच्या वरणाचे जास्त महत्त्व आहे. सोबतच पालकभाजी व इतरही भाज्यांमध्ये तूर व चनाडाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या कारणाने या डाळींची मागणीही जास्त असते. सोबतच उडीद व मुगाची डाळही जेवणात असतेच; परंतु दोन वर्षांपासून सर्वच डाळींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात डाळींचा समावेश करताना गृहिणींना नाकीनऊ येत आहे.
गत काही वर्षांपासून तुरीच्या डाळीचे उत्पन्न घटत चालले आहे. हाच प्रकार चना डाळीसोबतही पाहावयास मिळतो. सध्या तूर डाळ ११५ रुपये, उडीद ११५, मूग डाळ १२०, चना डाळ ८०, असे भाव पाहून गृहिणींच्या डोळ्यांत पाणी येत आहे. जिल्ह्यात तूर व चन्याचे उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात किमान खाण्यापुरती डाळ मिळून जाते. शहरात असलेल्या नागरिकांना मात्र सर्व पदार्थ विकत घ्यावे लागतात, तसेच उडीद व मुगाच्या डाळीचे उत्पन्न जिल्ह्यात नगण्य आहे; परंतु दाक्षिणात्य पदार्थांची क्रेझ वाढल्याने या डाळीचे प्रमाणही वाढले आहे. आहारातून पौष्टिकत्व कमी होत चालले आहे. या कारणाने डॉक्टर जेवणामध्ये डाळींचा उपयोग जास्त करण्याचा सल्ला देतात, तसेच सर्वच डाळी काही ना काही प्रमाणात आहारात असाव्यात, असेही डॉक्टर सांगतात; परंतु त्यांच्या किमती महागल्याने त्यांचा नियमित जेवणात उपयोग कसा करावा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे शासनाने डाळींच्या किमती स्थिर ठेवण्याची मागणी गृहिणींमधून होत आहे.
बॉक्स
घरच्या डाळींची मागणी जास्त
बाजारात सर्वच डाळी उपलब्ध असल्या तरी गावांमध्ये उत्पादित होत असलेल्या घरच्या डाळीची मागणीही जास्त आहे. अशी डाळ थोड्या जास्त किमतीतही घ्यायला शहरातील नागरिक तयार असतात. बाजारात मिळत असलेली तुरीची डाळ ही जास्त पिवळी व चमकदार असली तरी ती पॉलिश केलेली असते हे नागरिकांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे घरगुती डाळीला जास्त मागणी आहे. आहाराबाबत नागरिक जागरूक झाल्याने प्रत्येक गोष्ट पारखून घेण्याकडे कल असतो.
बॉक्स
आहारात सर्वत्र डाळींचा समावेश आवश्यक
तूर आणि चना डाळीच्या तुलनेत आहारात बाकी डाळींचा समावेश हा फार अत्यल्प असतो. त्यामुळे दोनच डाळींची मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती गगनाला भिडतात; पण यावर पर्याय म्हणून मिक्स डाळींचे वरण जेवणात असावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सर्वच डाळींचा आहारात सारखा समावेश असल्यास प्रथिनेही भरपूर प्रमाणात मिळतात आणि महागाईपासून थोडा दिलासा मिळतो. त्यामुळे गृहिणींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.