गावातील पथदिवे अजून किती दिवस राहणार बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:37+5:302021-09-02T05:02:37+5:30
केशोरी : सार्वजनिक पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह केशोरी येथील ...
केशोरी : सार्वजनिक पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह केशोरी येथील सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीने बंद केला आहे. तेव्हापासून येथील नागरिकांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस आणि सणासुदीच्या काळात तरी गावातील सार्वजनिक विद्युत पथदिवे प्रकाशमान होतील का? अजून किती दिवस अंधारात राहावे लागणार, असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण असते. परंतु गावातील सार्वजनिक पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल १५व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून भरण्यात यावे, असे शासनाने आदेश दिले आहेत. परंतु त्यामधून गावातील इतर सोयी-सुविधा पूर्ण करण्याचे नियोजन करून ग्रामपंचायतीने निधी खर्ची घालून सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरणे शक्य नसल्याचे सरपंच तालुका संघटनेने निवेदनातून म्हटले आहे. त्यामुळे अद्यापही सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही. संपूर्ण गावे अंधारात सापडली आहेत. अजून पथदिव्यांचा अंधार किती दिवस राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
.............
गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सणासुदीचे दिवस आल्यामुळे गावातील सार्वजनिक पथदिव्यांचा वीजपुरवठा नियमित करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. याकरिता संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने आणि विद्युत वितरण कंपनीने त्वरित तडजोड करून पथदिव्यांच्या विद्युत पुरवठा सुरू करावा. जेणेकरून नागरिकांच्या संघर्षाला तोंड देण्याची वेळ येणार नाही.