शेकडो एकरातील धान रोवणी खोळंबली
By admin | Published: August 24, 2016 12:07 AM2016-08-24T00:07:15+5:302016-08-24T00:07:15+5:30
परिसरातील २०-२५ गावांमध्ये मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बसरल्याच नाही. वरुणराजाच्या अवकृपेने बळीराजा मात्र
बोंडगावदेवी : परिसरातील २०-२५ गावांमध्ये मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बसरल्याच नाही. वरुणराजाच्या अवकृपेने बळीराजा मात्र अस्मानी संकटात सापडलेल्या स्थितीत दिसत आहे. पावसाचा एक थेंब न आल्याने परिसरातील शेकडो एकरातील धानाची रोवणीच झाली नाही, अशी विदारक स्थिती आज सर्वत्र दिसत आहे.
परिसरातील निमगाव, अरततोंडी, सिलेझरी, घुसोबाटोला, विहिरगाव, बोंडगावदेवी, चान्ना, देऊळगाव, सिल्ली (रिठी) बोदरा, बाक्टी, खांबी, पिंपळगाव, सरांडी (रिठी) चापटी, इंझोरी, सोमलपूर आदी गावांमध्ये जलसिंचनाच्या सोयींचा अभाव आहे. सदर गावशिवारात मोठ्या जलाशयाच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. काही गावांत आजही मालगूजारी, मोठे तलाव, माजी मालगूजार तलाव आहेत. परंतु यावर्षीच्या हंगामात पावसाने एकदाही दमदार हजेरी लावली नसल्याने तलावात पाण्याचा साठा झालेला दिसत नाही. निसर्गाने अवकृपा दाखविल्याने आजघडीला सिल्ली (रिठी) तसेच इतर ठिकाणातील शेकडो एकराच्यावर जमिनी पडीक अवस्थेत आहेत.
पाण्याच्या अभावाने धानाची रोवणी आजपावेतो झालेली नाही. तुरकळ पावसाने झालेले रोवणे पाण्याअभावी मरणास्तव झालेले दिसत आहेत. दमट वातावरणाने अळीचा प्रकोप वाढलेला दिसत आहे. परिसरातील बळीराजा येणाऱ्या दिवसात पाण्याची प्रतिक्षा करताना दिसतो. परंतु सकाळच्या प्रहरी निराश होतो.
आज शेतकरी वर्ग फार आर्थिक संकटात सापडला असताना परिसरातील लोकप्रतिनिधी शांत बसलेले दिसतात. दमदार पावसाने हजेरी न लावल्यामुळे परिसरात ठिकठिकाणी धानाची रोवणी खोळंबलेली दिसत आहे. शेतात मर-मर राबणारा बळीराजा आज निराश होऊन चिंतामग्न दिसत आहे. (वार्ताहर)
विहिरीमध्ये पाण्याचा ठणठणाट
जवळील ग्राम घुसोबाटोला येथील गावातील विहिरी भर पावसाळ्यात कोरड्याच असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या ग्रामवासीयांसमोर उभी झाली आहे. घुसोबाटोला हे गाव सिलेझरी गट ग्रामपंचायतमध्ये येते. पहाडी भागावर वसलेल्या गावात बऱ्याच घरांमध्ये खाजगी विहिरी आहेत. ५० ते ६० फुट खोलीच्या विहिरी असताना सुद्धा आजघडीला विहिरीमध्ये पाण्याचा ठणठणाट दिसत आहे. घरच्या विहिरींना भर पावसाळ्यात पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली दिसत आहे. ग्रामपंचायतच्यावतीने गावात बोअरवेलची व्यवस्था आहे. मोजक्या साधनाअभावी घुसोबाटोलावासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी कमालीची पायपीट करावी लागत आहे. परिसरात दमदार पावसाने एकदारी हजेरी लावली नसल्याने गावाशेजारील तळ्या-बोळ्यांमध्ये पाणी दिसत नाही. घरगुती विहिरीमध्ये एैन पावसाच्या दिवसात पाण्याचा बुंद संग्रहीत न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाल्याची परिस्थिती गावात दिसून येत आहे.