गोंदिया : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १० वर आली आहे तर जिल्ह्यातील आठपैकी चार तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून उर्वरित चार तालुक्यात सुध्दा दोन तीन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी (दि.२५) ६१५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५४६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ६९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात दोन नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३८ टक्के आहे. मागील दोन महिन्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून लवकरच जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हावासीयांनी खबरदारी आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत २१४५०९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १८९३०१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २२१६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २००५२१ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४११८२ कोरोना बाधित आढळले त्यापैकी ४०४७० जणांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत १० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ११२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........................
५६३३८६ नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यातील १४० केंद्रावरुन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ५ लाख ६३ हजार ३८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण १३ लाख २० हजार नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. यापैकी आतापर्यंत ४४ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.