पालकमंत्र्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:25+5:302021-04-19T04:26:25+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असून प्रशासनाने केलेल्या दप्तर दिरंगाईने परिस्थिती अधिक बिकट झाली असल्याचा ठपका पालकमंत्री ...
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असून प्रशासनाने केलेल्या दप्तर दिरंगाईने परिस्थिती अधिक बिकट झाली असल्याचा ठपका पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हा प्रशासनावर ठेवला होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवसांत साडेचारशे बेड आणि इतर उपाययोजना करण्याचे निर्देश शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले होते; पण अद्यापही यातील एकाही आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती आहे.
पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासाठी निधीची कुठलीही कमतरता नसल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतरही पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड परिस्थिती कशी नियंत्रणात येणार याबाबत शंकाच आहे. खासगी व शासकीय रुग्णालयात बेड्सची समस्या अद्यापही कायम आहे. ग्रामीण भागातील कोविड चाचणी केंद्र बंद आहेत. लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण नगण्य आहे. अशात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर विशेष म्हणजे पालकमंत्र्यांची आढावा बैठक होऊन तीन दिवस लोटत असताना अद्यापही बैठकीतील मिनिट्स लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्देशानंतर प्रशासन किती गंभीर आहे हेसुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी केवळ कागदावर सुरू असल्याचे चित्र आहे.