गोंदिया :काँग्रेस जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर पक्ष शिस्त मोडल्याच्या कारणावरून वरिष्ठांनी कारवाई करावी, यासाठी काँग्रेस बचाव समितीने गोंदियातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात १ जूनपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी भेट दिली व पुढील दहा दिवसांत यावर ठोस कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे वृत्त प्रदेश काँग्रेस कमिटीला कळताच पक्षातील वरिष्ठ काँग्रेस अधिकाऱ्यांनी गोंदियातील आंदोलनस्थळी पोहोचून उपोषणकर्त्यांची भेट घेतली. लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. वरिष्ठांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी मंगळवारी (दि. ६) आंदोलन मागे घेतले. गोंदिया जिल्हा काँग्रेस पक्षात सध्या गटबाजी उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्याकडून बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप सोबत युती करणाऱ्या व पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाला न मानणाऱ्या, गटबाजी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या काँग्रेस बचाव समितीने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेसजनांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
गटबाजीमुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे. यासाठी पक्षाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत जिल्हा काँग्रेस कार्यालयात बेमुदत उपोषणाची मालिका सुरू करण्यात आली होती. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव मुजीब पठाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले व त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. १५ जूनपर्यंत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर मंगळवारपासून आंदोलन मागे घेण्यात आले.
सकारात्मक आश्वासनाने आंदोलन स्थगित
प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव मुजीब पठाण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. ज्यावर विश्वास ठेवून ६ जूनपासून आंदोलन तूर्तास स्थगित केले असल्याचे आलोक मोहंती यांनी सांगितले.
कारवाईसाठी मुंबई येथे होणार मंथन
पक्षाविरुद्ध जाऊन कारवाया करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित मुंबईत मंथन होणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाणार आहे.