निराधारांच्या अनुदानात वाढ करा
By Admin | Published: March 4, 2016 01:55 AM2016-03-04T01:55:25+5:302016-03-04T01:55:25+5:30
विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाद्वारे निराधार, विधवा, अपंग, वयोवृध्द यांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत.
अनुदान जुनेच : वाढत्या महागाईत अल्पशा निधीत उदरनिर्वाह कठीण
रावणवाडी : विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाद्वारे निराधार, विधवा, अपंग, वयोवृध्द यांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योनजेच्या आरंभ झाल्यापासून अनुदानात वाढ झालेली नाही. सध्या जीवनावश्यक वस्तंूच्या महागाईतही लाभार्थ्यांना ६०० रुपये प्रति महिना अनुदान मिळत आहे. या अनुदानात वाढ करण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
सध्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, वृध्दापकाळ निवृत्त योजना, राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना अशा अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांमध्ये केंद्र व राज्य शासनाचाही निधी समाविष्ट असला तरी अनुदानाची रक्कम तोकडीच आहे. सदर अनुदान दर महिन्यात न मिळता एक-दोन महिन्याच्या फरकाने मिळत असतो. याकरिता को-आॅपरेटिव्ह बँक आणि कोकण ग्रामीण बँकेत मोठ्या प्रमाणात निराधारांची रांग लागून गर्दी असते.
जीवनावश्यक वस्तंूची वाढती महागाई लक्षात घेता ६०० रुपयांचे अनुदान अगदी तोकडे आहे. बँकेतून अनुदानाची रक्कम काढण्यासाठी निरक्षर निराधारांना बँकेच्या स्लिप (फार्म) भरण्याकरिता बँकेच्या परिसरात वावरणाऱ्या दलालांची मदत घेऊन अनुदानाची रक्कम काढून घ्यावे लागते. प्रत्येक निराधारास दलालानांही पैसे मोजने भाग पडते. त्यामुळे निराधारांना ६०० रुपयेसुद्धा प्राप्त होत नाही. अशा लाभार्थ्यांना महिनाभराचा खर्च कसा भागवावा, अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी महागाई वाढतच जात आहे. शासन जेवढे अनुदान निराधारांना देते, तेवढ्या रूपयांत महिनाभराचे भोजन मिळणेही अत्यंत कठिण होत आहे. भोजनाशिवाय आरोग्याच्या समस्यासुद्धा उद्भवत असतात. या व इतर समस्यांचा कसा निपटारा करावा, अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर आवासून उभ्या आहेत.
यासाठी अपंग निराधारांच्या अनुदानात वाढत्या महागाईनुसार वाढ करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)