गोंदिया : पोलीसपाटलांच्या मानधनात वाढ करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीसपाटील संघटनेच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संघटनेच्या वतीने ना. वळसे पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या बैठकीत आ. मनोहर चंद्रिकापुरे, पोलीसपाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, औरंगाबाद विभाग अध्यक्ष जब्बार पठाण, गडचिरोली जिल्हाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे, सचिव मुरारी दहीकर, तुकडोजी डोंगरवार, ब्रह्मपुरी उपशाखा अध्यक्ष किशोर तिडके, नरेंद्र बनपूरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, पोलीसपाटल्यांच्या मागण्यांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन वळसे पाटील व खासदार प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आले. याप्रसंगी वळसे पाटील यांनी, पोलीसपाटील ग्रामपातळीवर शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो. आपण अधिक सक्षमपणे कार्य करावे अशी शासनाची अपेक्षा आहे. पोलीसपाटलांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया आपण सुरू करू असे आश्वासन दिले. आमदार चंद्रीकापुरे यांनी, पोलीसपाटील सक्षम होतील तर याचा फायदा पोलीस विभागाला होईल. त्यामुळे पोलीसपाटलांच्या समस्या अग्रक्रमाने सोडविण्याची नितांत आवश्यकता आहे असे सांगितले. प्रास्ताविक परशुरामकर यांनी मांडले. आभार जब्बार पठाण यांनी मानले.----------------------------------
या आहेत पोलीसपाटलांच्या मागण्या
पोलीसपाटलांच्या मानधनात वाढ व सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करण्यात यावे, सर्व सेवानिवृत्त पोलीसपाटलांना सेवानिवृत्तीची योजना लागू करावी, कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलीसपाटलांना मंजूर विम्याची रक्कम ५० लाख रुपये त्वरित देण्यात यावी, ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, पदाचे नूतनीकरण बंद करण्यात यावे, विभागीय चौकशी पूर्ण केल्याशिवाय पोलीसपाटलांवर कार्यवाही करण्यात येऊ नये, निलंबित व बडतर्फ पोलीसपाटलांना ३ महिन्यांच्या कालावधीत सेवेत घेण्यात यावे, सर्व पोलीसपाटलांना नियमित प्रवास भत्ता देण्यात यावा, कोरोना संक्रमण झालेल्या पोलीसपाटलांचा झालेला वैद्यकीय उपचार खर्च देण्यात यावा आदी मागण्या मांडून त्यावर चर्चा करण्यात आली.