आठ दिवसात वाढले २७३६ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:31 AM2021-04-09T04:31:17+5:302021-04-09T04:31:17+5:30
गोंदिया : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. तो आठवडाभर कायम असल्याने जिल्ह्यात आठ दिवसात २७३६ कोरोनाबाधितांची ...
गोंदिया : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. तो आठवडाभर कायम असल्याने जिल्ह्यात आठ दिवसात २७३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर तब्बल १३ बाधितांचा मृत्यू झाला. या रुग्णसंख्येने मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याचासुध्दा रेकार्ड ब्रेक केला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेटसुध्दा १० टक्केच्या वर गेला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे.
कोराेनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढत असून गुरुवारी (दि.८) जिल्ह्यात ५७६ बाधितांची नोंद झाली. तर पाच बाधितांचा मृत्यू झाला. पाच मृतक ३० ते ६५ वर्षे वयोगटातील असून या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३०३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६५, गोरेगाव १८, आमगाव ४४, सालेकसा ०४, देवरी १४, सडक अर्जुनी ६८, अर्जुनी मोरगाव ५४ व बाहेरील ६ बाधितांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १११७७४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९६६८२ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ९८२२५ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८९७४३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १८७९६ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १५७५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २८३२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी १६९१ रुग्ण गृहविलगीकरणात आहे. तर ८४८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..........
मृत्यूचे प्रमाण वाढल्याने वाढली चिंता
मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गात वाढ होण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यात एकूण १४६७ रुग्णांची नोंद झाली तर ८ बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र एप्रिल महिन्यात पहिल्याच आठ दिवसात २७३६ बाधितांची नोंद झाली असून तब्बल १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
...........
चार तालुक्यांवर बारीक नजर
गोंदिया, आमगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यात सर्वाधिक १६५७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. त्यामुळे हे तालुके कोरोनाचे हॉटस्पाॅट होत चाललेेले असून या तालुक्यांवर प्रशासनाची बारीक नजर आहे.
..........
कलेक्टर, एसपी, सीईओ मैदानात
जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यानंतर त्याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी केली जात आहे अथवा नाही याची पाहणी करण्यासाठी बुधवारपासून जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे हे मैदानात उतरले आहेत.