जबाबदार कोण ? : आमगावच्या ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा यशवंत मानकर ल्ल आमगावशासनाने आरोग्य विभागासाठी सेवा दिल्यानंतर वापरण्यात आलेले साहित्य कसे ठेवावे व त्याची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भात नियम तयार केले. मात्र या नियमांना डावलणारे रुग्णालय म्हणजे येथीले ग्रामीण रुग्णालय आहे. रुग्णांना सेवा दिल्यानंतर वापरण्यात आलेले इंजेक्शन, निडल, सलाईनची बॉटल व इंजेक्शनसाठी वापरलेले बॉटल रुग्णालय परिसरात कुठे ही फेकल्या जातात. यामुळे आरोग्य विभाग रुग्णांच्या सेवेसाठी किती तत्पर आहे याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. आमगावचे ग्रामीण रुग्णालय तालुकावासीयांसाठी वरदान नव्हे तर शाप ठरत आहे. येथील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले हे रुग्णालय आता सलाईनवर सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णालयात अव्यवस्था कायमची घर करून आहे. पावसाळ्याच्या दिवसात रुग्णांची संख्या बरीच वाढते. मात्र या ठिकाणी योग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. परंतु तालुक्यात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या नागरिकांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नसल्याने ते उपचारासाठी तासनतास या रुग्णालयात उभे असतात. या रुग्णालयात तीन डॉक्टरांची नियुक्ती असताना सध्या एकच डॉक्टर कार्यरत आहे. संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार आयुषच्या डॉक्टरांच्या भरवश्यावर सुरू आहे. या रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असूनही त्यांना व्यवस्था व्हावी यासाठी आरोग्य विभागातर्फे मात्र कसली ही उपाय योजना केली जात नाही. या रुग्णालयात कचऱ्याचे साम्राज्य नेहमीच पसरलेले असते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मृत्युच्या दाढेत पाठविण्यासाठी या रुग्णालयाचे वातावरण पोषक आहे. या रुग्णालयात तीन कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु यापैकी एक महिला कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून सुट्टीवरच आहेत. तर दोन कर्मचारी कधी कधी आळी पाळीने स्वच्छता करतात. परंतु या आठवड्यात या रुग्णालयाची स्वच्छता देखील झाली नाही. परिणामी येथील आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी रुग्णांसाठी वापरलेले इंजेक्शन, निडल, सलाईनची बॉटल व इंजेक्शनसाठी वापरलेले बॉटल वाटेल त्या ठिकाणी फेकून दिल्या आहेत. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर ते सिरींज कुठे ठेवावे याचे भान येथील डॉक्टरांना नाही का? असा प्रश्न येथे येणाऱ्या रुग्णांना पडतो. रुग्णांच्या कक्षाबाहेर असलेल्या दाराच्या कोपऱ्यात सिरींज व सलाईनच्या बॉटल अस्ताव्यस्त फेकलेल्या होत्या. याच वॉर्डाजवळील काही अंतरावर या रुग्णालयात वापरण्यात आलेले सिरींज मोठ्या प्रमाणात गोळा करून ठेवल्या होत्या. निडल्स, सिरींज किंवा रुग्णांसाठी वापरण्यात आलेले साहित्य उघड्यावर ठेवता येत नाही. परंतु हा प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयात सर्रास पहायला मिळतो. रुग्णांसाठी वापरलेले साहित्य नष्ट करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया करावी लागते. मात्र ग्रामीण रुग्णालयात हे साहित्य नष्ट करण्यासाठी कोणती कारवाई करतात, हे माहित नाही. या रुग्णालयात असलेल्या अस्वच्छतेमुळे येथील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या कक्षाची स्वच्छता स्वत:च करावी लागते. येथील प्रयोगशाळेत दररोज रक्त तपासणाऱ्या रुग्णांची गर्दी राहत असल्याने येथील साहित्य स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच काम करावे लागते. स्वच्छता कर्मचारी बेपत्ता राहत असून याकडे कोणतेही वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत नाही. औषधांचा साठा असलेल्या कक्षाची गत अत्यंत गंभीर आहे. जिल्हास्तरावरून आलेली औषधी ठेवण्यासाठी जागा अपूरी आहे. त्यातच या कक्षाची स्वच्छता मागील अनेक दिवसांपासून झाली नसल्याने कचरा व धुळामध्ये औषधी पडून आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सकांनी या रुग्णालयाकडे दुर्लक्ष केल्याचे समजते.
इंजेक्शन फेकतात उघड्यावर
By admin | Published: September 15, 2014 12:12 AM