गोंदिया : धानाचे पोते भरून असलेली ट्रॉली चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला दवनीवाडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रॉली व धान असा एकूण एक लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील ग्राम रतनारा येथील थानसिंग बसेने यांच्या घराशेजारील शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये २४ पोते धान ठेवले होते. २ मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी धानाचे पोते असलेली ट्रॉलीच चोरून नेली होती. प्रकरणी दवनीवाडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास दवनीवाडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता.
अशातच पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी (दि.९) मनीष ऊर्फ जयराम धर्मदास सेवईवार (रा. बलमाटोला), रमेश रायसिंग कुंभरे (रा. बिजेपार,गडचिरोली), देवलाल ऊर्फ देवा सहीतराम चंद्रवंशी (रा. बागरेकसा,डोंगरगड), नरसिंग ऊर्फ नरेश मिलाप वर्मा (रा. विचारपुर,खैरागड), श्रवण राधेलाल वर्मा (रा. हिरापूर, डोंगरगड) यांना महाराष्ट्र तसेच छत्तीसगड राज्यातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरलेली ट्रॉली किमत ८० हजार, ९ क्विंटल धान किमती २० हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडाचे पोलिस निरीक्षक सतीश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक पोलिस निरीक्षक पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुखदेव राऊत, सहायक फौजदार देवराम खंडाते, पोलिस हवालदार मिल्कीराम पटले, सोमेंद्रसिंग तुरकर, रियाज शेख, लक्ष्मण बंजार, संतोष केदार, नरेश नागपुरे, गणेश ठाकरे, राजेश दमाहे यांनी केली आहे.