अवैध होर्डिंग्स काढण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:10+5:30
शहर या होर्डिंग्सच्या गर्दीत हरवित चालले आहे. विशेष म्हणजे, होर्डिंग्सबाजीच्या आवात कित्येकदा चौकात किंवा रस्त्याच्या काढावरच दर्शनीभागात हे होर्डिंग लावले जातात. अशात कित्येकदा समोरची व्यक्ती या होर्डिंग्समुळे दिसत नसून अपघात घडतात व घडले आहेत. एकीकडे होर्डिंग्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असतानाच यातून अपघात घडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवैधरित्या लावण्यात आलेल्या तसेच परवानगीचा कालावधी निघून गेलेल्या होर्डिंग्सची शहरात चांगलीच गर्दी झाली आहे. या होर्डिंगबाजीमुळे शहर विद्रुप होत असतानाच कित्येकदा होर्डिंग्समुळे अपघात घडत आहेत. अशा या होर्डिंग्सला काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने पुढाकार घेतला असून नगर परिषदेच्या सहकार्याने शहरातील होर्डिंग्स काढण्याची मोहीम शनिवारी (दि.१८) सुरू केली.
शहरात राजकारण्यांपासून ते सामाजिक संस्था व खासगीस्तरावर प्रत्येकच बाबीला घेऊन होर्डिंग्स लावले जातात. कित्येकदा हे होर्डिंग्स लावण्यासाठी नगर परिषदेची परवानगी घेतली जात नाही. किंवा कित्येकांची परवानगी संपलेली असतानाही ते होर्डिंग्स काढले जात नाही.
परिणामी शहर या होर्डिंग्सच्या गर्दीत हरवित चालले आहे. विशेष म्हणजे, होर्डिंग्सबाजीच्या आवात कित्येकदा चौकात किंवा रस्त्याच्या काढावरच दर्शनीभागात हे होर्डिंग लावले जातात. अशात कित्येकदा समोरची व्यक्ती या होर्डिंग्समुळे दिसत नसून अपघात घडतात व घडले आहेत. एकीकडे होर्डिंग्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असतानाच यातून अपघात घडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहे. ही बाब हेरून वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी असुरक्षीतरित्या लावण्यात आलेले व वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे होर्डिंग काढण्यासाठी नगर परिषदेला पत्र दिले.
एवढेच नव्हे तर नगर परिषद कर्मचाऱ्यांना सोबत घेत शनिवारी (दि.१८) होर्डिंग्स काढण्याची मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत तायडे यांनी स्वत: भाग घेत होर्डिंग्स उतरवून घेतले.
विशेष म्हणजे, या मोहिमेमुळे कित्येक परवानगीचा कालावधी संपलेले होर्डिंग्सही काढण्यात आल्याने शहरातील तेवढी जागा मोकळी दिसली.
सोमवारी पुलापलिकडील भागात मोहीम
या मोहिमेंतर्गत शनिवारी गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक-नेहरू चौक व पुलापलीकडे शक्ती चौक परिसरातील होर्डिंग्स काढण्यात आले. त्यानंतर आता सोमवारी (दि.२०) पुलापलीकडे मरारटोली, टी-पॉंईंट परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तायडे यांनी सांगीतले.