गहाणे यांचीही चौकशी करा
By admin | Published: September 7, 2016 12:36 AM2016-09-07T00:36:23+5:302016-09-07T00:36:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सभागृहातील जेष्ठ सदस्य सुरेश हर्षे हे पदाधिकाऱ्याकडून होणाऱ्या मनमानीला ते चाप लावत असल्याने
राष्ट्रवादीची भूमिका : स्थायी समिती सदस्य आक्रमक
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सभागृहातील जेष्ठ सदस्य सुरेश हर्षे हे पदाधिकाऱ्याकडून होणाऱ्या मनमानीला ते चाप लावत असल्याने एका खोट्या तक्रारीचा आधार घेवून जि.प.च्या पदाधिकाऱ्यांनी हर्षे यांच्या विरोधात चौकशी लावली. त्याला आमची हरकत नाही, पण सोबतच जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे यांचीही चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.मधील गटनेता गंगाधर परशुरामकर यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जि.प.उपाध्यक्ष गहाणे दौरा करतात गोंदिया तालुक्यात आणि त्यांच्याकडील जि.प.च्या वाहनात पेट्रोल टाकतात अर्जुनी-मोरगावमध्ये, हा भ्रष्टाचाराबरोबर पदाचा दुरुपयोग आहे, असाही आरोप त्यांनी केला. जि.प.सदस्य हर्षे यांच्या विरोधात आमगाव तालुक्यातील कट्टीपार ग्राम पंचायतच्या लोकांनी जी तक्रार केली त्या तक्रारीची शहानिशा न करता उपाध्यक्षांनी व शिक्षण सभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा अशा आशयाचे पत्र दिले. तसेच शिक्षण विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असणारे तसेच दिवाकर खोब्रागडे यांना विभागीय आयुक्त, नागपूर यांनी आमगाव किंवा सालेकसा येथे अकार्यकारी पदावर ठेवण्याचे आदेश दिले असताना त्यांना अधीक्षक पदावर कसे काय ठेवले? असा प्रश्न परशुरामकर यांनी उपस्थित करून सभागृहातील चर्चेचा नूर पलटवला. या सभेत पदाधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपाच्या समिती सदस्यांनी एकीचे दर्शन घडवून असंतोषाला वाट मोकळी करून दिली. रमेश अंबुले, उषा सहारे, राजलक्ष्मी तुरकर, अलफाब पठान, रजनी कुंभरे, सुरेश हर्षे, शोभेलाल कटरे यांनी चर्चेत भाग घेतला. (जिल्हा प्रतिनिधी)