लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची उचल करून भरडाई करण्यास राईस मिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.७) झालेल्या बैठकीत सकारात्मकता दाखविली. त्यामुळे रबी हंगामातील धान खरेदीचा मार्ग सुरू सुकर झाला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने या दोन्ही विभागांनी खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. परिणामी, लाखो क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. हा धान तसाच पडून राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच प्रमाणात धान गोदामात पडून असल्याने रबी हंगामातील धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेत यावर तोडगा काढण्यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याशी चर्चा केली होती. तसेच यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील हे शुक्रवारी गोंदिया येथे आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाचे अधिकारी आणि राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह चर्चा केली. यावेळी राईस मिलर्सने सकारात्मकता दाखविल्याने आता धानाच्या भरडाईचा मार्ग मोकळा होणार आहे. या बैठकीत आ. मनाेहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन, आ. सहषराम कोरोटेयांनी खरिपातील धानाची त्वरित उचल करून रबी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याकडे केली. त्यांनी सुद्धा धान खरेदी त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. धान खरेदी आणि भरडाईच्या प्रश्नावर खा. प्रफुल्ल पटेल यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी त्यांनी याच विषयावर मुंबई येथे बैठक घेतली. त्यानंतर शुक्रवारी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी गोंदिया येथे पोहोचले होते. त्यांनी सुद्धा धान खरेदीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. बैठकीला जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासगी गोदाम भाड्याने घ्या खरीप हंगामात खरेदी केलेला ५० लाख क्विंटल धान तसाच गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे रबीची धान खरेदी करण्याची अडचण जात आहे. त्यामुळे या धानाची साठवणूक करण्यासाठी खासगी गोदाम भाड्याने घेऊन उचल करण्यात यावी, अशी मागणी आ. मनाेहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव पाटील यांच्याकडे केली.