लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासी क्षेत्रातील झाशीनगर येथील मोबाईल टॉवर केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. गेल्या महिनाभरापासून कव्हरेजअभावी या गावातील मोबाईल सेवा ठप्प झाली असून झाशीनगरवासी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंपनीने मोबाईल टॉवरची दुरुस्ती करुन ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे किंवा ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध यावर आरोग्य सुविधेसाठी झाशीनगरवासी अवलंबून आहेत. आरोग्याच्या अशा आणीबाणीप्रसंगी मोबाईलवरुन रुग्णवाहिका व रुग्णसेविका उपलब्ध करण्यासाठी संपर्क करावा लागतो. परंतु गेल्या महिनाभरापासून मोबाईल सेवा बंद पडल्याने रुग्णांसह अन्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. एका मातेला प्रसुतीकरिता खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय नवेगावबांधला दाखल करावे लागले. तेव्हा कुठे तिची सुखरुप सुटका झाली. अशा अनेक अडचणींचा सामना झाशीनगरवासीयांना करावा लागत आहे.कंपनीकडे तक्रार करुनही ते याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. बीएसएनएलचे टॉवर तर शोभेची वस्तूच ठरली आहे. टॉवर आहेत पण कव्हरेज नाही. दोन महिन्यापासून बीएसएनएल सेवा ठप्प झाली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देवून संपर्क खंडित झालेल्या झाशीनगरवासीयांना संपर्क क्षेत्रात आणावे, अशी मागणी होत आहे.
महिनाभरापासून झाशीनगरवासी ‘नॉट रिचेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 9:58 PM