लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्हा विकासाच्या मार्गावर झपाट्याने चालत आहे. पोलिसांचे काम अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी अत्याधुनिक असलेल्या ६ स्काॅर्पिओ व ४० बोलेरो उपलब्ध करून दिल्या. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून जिल्हा पोलिसांना त्यांच्या कामासाठी ही वाहने मदत करतील. पोलीस समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम करतात. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडच्या कामातही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करताना अनेक पोलिसांचा मृत्यू झाला. तर अनेकांना कोविडचा त्रास सहन करावा लागला. समाजासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांचे महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. जिल्हा नियोजन व विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या ४६ वाहनांच्या पोलीस मुख्यालयात (कारंजा) आयोजित लोकार्पण कार्यक्रमात रविवारी (दि. १८) ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहेसराम कोरोटे, आ. अभिजित वंजारी, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन.डी. किरसान, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, अमर वऱ्हाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपस्थित होते. लाल फीत कापून वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक पानसरे यांनी, आम्हाला कुठे क्राइम घडले याची माहिती मिळाली तर आम्ही ६ ते ७ मिनिटांत घटनास्थळावर पोहोचतो. परंतु ही अत्याधुनिक वाहने मिळाल्याने ५ मिनिटांच्या आत घटनास्थळावर आता पोहोचता येईल, असे सांगितले. संचालन रामनगरचे ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी केले. आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्विनी कदम यांनी मानले. या वेळी सर्व आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल, गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, तिराेडाचे नितीन यादव, गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, ग्रामीणचे ठाणेदार विजय राणे, रावणवाडीचे उमेश पाटील, आमगावचे विलास नाळे, सालेकसाचे प्रमोद बघेले, नक्षलविरोधी अभियानाचे शरद पाटील, श्रीकांत हत्तीमारे उपस्थित होते. या वेळी लिपिक बोपचे यांचा सत्कार करण्यात आला.