देवरी : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृध्दी व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठागौरींचे अर्थात महालक्ष्मीचे रविवारी (दि.१२) आगमन होत आहे. सोमवारी (दि.१३) महालक्ष्मी पूजन व महानैवैद्य अर्पण करण्यात येईल तर मंगळवारी (दि.१४) गौरीला निरोप दिला जाईल. शहरात दोनच घरांमध्ये महालक्ष्मीचे रविवारी आगमन होणार आहे.
भाद्रपद महिन्यात शुध्द पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाते. पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर तर विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असते. परंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो. शहरात चंदू कुंडलीकर यांच्या घरी मागील ७० वर्षांपासून गौरीचे आवाहन केले जाते तर महेंद्र जौंजाळ यांच्या घरी मागील १२ वर्षापासून ज्येष्ठा गौरीची परंपरा अबाधित सुरु आहे. शहरात दोनच ठिकाणी ज्येष्ठागौरीचे आगमन होत असल्याने या दोन्ही घरी भाविकांची गर्दी पहायला मिळते. काही कुटुंबांमध्ये धान्यावर बसलेल्या तर काहींकडे उभ्या महालक्ष्मीला दागिने तसेच मुखवटे घालून सजावट व विविध शृंगार करीत सजविले जाते.
कुटुंबात लक्ष्मीचा वास राहून सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृध्दी घरात नांदावी यासाठी गौरीपूजन करण्यात येते. पुरणपोळी, लाडू, करंजी, सोळा प्रकारच्या भाज्या, अनरसे, करंजी यासह अन्य पंचपक्वानांचा नैवैद्य देवीला अर्पण करण्यात येतो. ज्वारीचे पीठ व ताकापासून तयार करण्यात आलेल्या आंबिलला महानैवैद्याला विशेष महत्व आहे. गौरी आवाहनासाठी अंगणात सडासंमार्जन करून रांगोळीने गौरीची हळदी कुंकवाची पावले काढली जातात. त्यावर लक्ष्मीचा विविध प्रकारचा उल्लेख करण्यात येत असतो, त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो.