शासन निर्णयाला सचिवाने दाखविली केराची टोपली
By admin | Published: August 25, 2016 12:18 AM2016-08-25T00:18:16+5:302016-08-25T00:18:16+5:30
कट्टीपार व गोसाईटोला ग्रामपंचायतीअंतर्गत शाळा दुरुस्ती आणि शालेय आवार भिंतीच्या बांधकामात ई- निविदेने साहित्य खरेदी करण्यात आले नाही.
गावकऱ्यांची तक्रार : कट्टीपार येथील सचिवाचा प्रताप
कालीमाटी : कट्टीपार व गोसाईटोला ग्रामपंचायतीअंतर्गत शाळा दुरुस्ती आणि शालेय आवार भिंतीच्या बांधकामात ई- निविदेने साहित्य खरेदी करण्यात आले नाही. असा ठपका ठेवत गावकऱ्यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना तक्रार केली आहे. पंचायत समिती आमगाव अंतर्गत ग्रामपंचायत कट्टीपार व गोसाईटोला येथील विविध कामात ई-निविदेद्वारे साहित्य खरेदी करण्यात आले नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
ग्रामपंचायत कट्टीपार येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शाळा दुरुस्ती कामाकरिता ५ लाख रुपयांच्यावर निधीला मंजुरी मिळाली. या कार्यात एक लाख रुपयावरचे साहित्य खरेदीकरिता ई-निविदा काढावी लागते. पण सदर कार्यात ई-निविदा काढण्यात आली नाही, अशी तक्रार विभागीय आयुक्त यांना गावकऱ्यांनी केली आहे. या कार्यात लेंटर भिंत दुरुस्ती, लेंटर ढलाई, व्हरांडा स्लॅप ढलाईपर्यंत कार्य पूर्णत: वास झाले आहे. येथील कामाकिरता साहित्य खरेदी करुन सदर साहित्य शाळेतील पटांगणात पडलेला आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी न घेता कामे सुरू करण्यात आली आहे. यामुळे शाळेच्या आवारात साहित्य पडून असून त्यांचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. शाळेतील दुरुस्तीकरिता जिर्ण व खंडीत इमारतीची निवड केली आहे. यामुळे ती दुरुस्ती उपयोगी नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना विश्वासात न घेता कार्य सुरू करण्यात आले. ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयाचे पालन न करता शाळा दुरुस्तीचे कार्य ५० टक्के पूर्ण करण्यात आले.
ग्रामपंचायत गोसाईटोला येथील प्राथमिक शाळा आवारभिंत ५ लाख रुपये नक्षलग्रस्त निधीअंतर्गत मंजुर असून सदर आवार भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सदर कामाचे साहित्य खरेदीकरिता ई-निविदा न काढता बांधकाम पूर्णत्वास नेले आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महाकाळकर आहेत. यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप प्रसिद्धीपत्रकात समाज सेवक अशोक राऊत यांनी केले आहे .या प्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक महाकाळकर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी समाजसेवक अशोक राऊत यांनी उपकार्यपालन अधिकारी गोंदिया, कार्यकारी अभियंता सा.बां., खंडविकास अधिकारी यांना केली आहे. (वार्ताहर)