गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशीन मागील चार महिन्यांपासून नादुरूस्त पडून आहे. लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या उदघाटनाला ४ मे रोजी आरोग्यमंत्री आले असताना त्यांनी सदर सिटी स्कॅन मशीन सुरू करण्याचे आदेश दिलेत. परंतु अजूनही त्यांच्या आदेशाची अमंलबजावणी झाली नाही. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून खासगी रूग्णालयात सेवा घ्यावी लागत आहे. प्रत्येकाला आरोग्याची सुविधा मिळाली यासाठी शासनाकडून आरोग्य विभागावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. शिवाय शासकीय रूग्णालयात सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करविल्या जात आहेत. जेणेकरून शासकीय रूग्णालयात येणाऱ्या गरजूंना महागड्या उपचाराचा खर्च वहन करावा लागू नये. येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात मात्र या विपरीत काम सुरू आहे. येथे येणाऱ्या रूग्णांना खिशातून खर्च करून आपली गरज भागवावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, येथील सिटीस्कॅ न मशीन मागील चार महिन्यांपासून बंद पडून आहे. या सिटी स्कॅन मशीनची दुरूस्ती करण्यासाठी बाहेरून व्यक्ती आणावे लागले. जर्मनी येथून या सिटी स्कॅनचे साहित्य आणण्यात आले. काही साहित्य लावल्यावर रूग्णांच्या सेवेसाठी ही मशीन सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र मशीन काही सुरू झाली नाही. त्यामुळे येथील रूग्णांना सिटी स्कॅनची सेवा घेण्यासाठी खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे एका रूग्णावर अडीच हजार रूपये सिटी स्कॅनचा खर्च पडतो. आर्थिकदृष्टया कमकुवत व्यक्तीच शासकीय रूग्णालयात उपचारासाठी येतात. अशात त्यांना सिटी स्कॅनसाठी हजारो रूपये मोजावे लागत असल्याने त्यांनी जायचे कोठे असा प्रश्न पडत आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत: आदेश दिल्यानंतरही त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी येथे होताना दिसत नाही. यातून येथील रूग्णालय प्रशासन निगरगट्ट आहे याची प्रचिती येते. मात्र याचा फटका गरिबांना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)निधीचा अभाव दाखविला जातो४सिटी स्कॅन मशीन चालविण्यासाठी नियमित तज्ज्ञ नसल्यामुळे सिटी स्कॅन चालविण्यासाठी कंत्राटी तत्वावर डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. परंतु निधी अभावी त्यांना मानधन न दिल्यामुळे या सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जाते. शिवाय एयरकुल्ड कक्ष नसल्यामुळेही मशीन खराब झाल्याचे सांगितले जाते.
केटीएसची सिटी स्कॅन चार महिन्यांपासून बंद
By admin | Published: June 14, 2016 1:17 AM