पांगोली नदीच्या पाण्यात गाडले बिबट्याचे मुंडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:17+5:302021-01-19T04:31:17+5:30
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील तिल्ली-मोहगाव येथील शेतात करंट लावून दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली. यातील एका बिबट्याचे मुंडके कापून ...
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील तिल्ली-मोहगाव येथील शेतात करंट लावून दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली. यातील एका बिबट्याचे मुंडके कापून आरोपींनी गौरीटोला ते चांगोटोला दरम्यान असलेल्या पांगोली नदीच्या पाण्यात गाडून ठेवले होते. सोमवारी (दि. १८) आरोपी हेतराम मधू गावळ (३८) याने वनाधिकाऱ्यांना ती जागा दाखविली असता बिबट्याचे मुंडके, दात व मिशीसह जप्त केले आहे, अशी माहिती सहायक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर यांनी दिली आहे.
ग्राम तिल्ली येथील इंदिरानगर येथील देवानंद सोनवाने यांच्या शेतातील विहिरीत ३ जानेवारी रोजी एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. बिबट्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत असता ४ जानेवारी रोजी घटनास्थळालगत लागून असलेल्या जंगलातील झुडपात दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तर जवळच नीलगायीचे अवशेष मिळून आले होते. या प्रकरणात हेतराम मधू गावळ (३८, रा. इंदिरानगर, तिल्ली), देवराम श्यामलाल नागपुरे (३०) लिंगम रमेश येरोला (५५), हेतराम गणपत मेश्राम (४१, रा. चोपा- बाजारटोला) या चौघांना अटक करण्यात आली. लिंगम याने गावातीलच मन्साराम यांच्या घरी लपवून ठेवलेली ४ नखे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि. २०) वनकोठडी सुनावली आहे.