चान्ना-बाक्टी परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:03+5:302021-04-19T04:26:03+5:30
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनविभागांतर्गत येत असलेल्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील चान्ना, बाक्टी, ...
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनविभागांतर्गत येत असलेल्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील चान्ना, बाक्टी, एरंडीदेवी, विहीरगाव, बरड्या, सिलेझरी, सोमलपूर, सिरेगावबांध या गावांत बिबट्याचे रोजच दर्शन होत आहे. तसेच शेळ्या, कोंबड्या, गोरे, कालवडी, गायीचे बछडे यांची शिकार नित्याचेच झाले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील बाक्टी येथील मार्कंड फुंडे हे १६ एप्रिल रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास शौचास उठले असता त्यांना बिबट्या दिसल्याने ते परत घरी आले. १ मार्च रोजी मुरलीधर कावळे यांच्या गोठ्यात बिबट्याने गायींच्या वासराला फस्त केले. तसेच काही दिवसांपूर्वी सरपंच भानुदास वळगाये यांना मार्गावर बिबट आपल्या पिल्लांसह रस्त्यावर दिसून आले. दरम्यान, रस्त्यावरुन प्रवास करताना प्रवाशांनी हे दृश्य पाहून खूप भयभीत झाले होते. अशा घटनांमुळे चान्ना-बाक्टी परिसरात बिबट्याची दशहत निर्माण झाली आहे. मात्र, या परिसराचे क्षेत्र सहायक व बिट गार्ड मात्र या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. क्षेत्र सहायक यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिल्यास तुम्ही आम्हाला नाहक त्रास देता असे उलचसुलट उत्तर देत असतात. यामुळे येथील लाकूड तस्करसुद्धा बिनधास्तपणे तस्करी करीत आहेत. त्यामुळे जंगलाचे परिसराची देखभाल राखण वनमजूर करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देवून बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.